अनिकेत कोथळेचा खटला उज्ज्वल निकम लढवणार : केसरकर
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 04:55 PM (IST)
सांगलीला जाऊन दीपक केसरकर यांनी कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली.
मुंबई : अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाची केस ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे दिली जाणार आहे. शिवाय या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सांगलीला जाऊन दीपक केसरकर यांनी कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोथळे कुटुंबीयांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. शिवाय साक्षीदार आणि कोथळे कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले असल्याचंही दीपक केसरकर यांनी सांगितलं. प्रकरणाचा सीआयडी तपास सुरु आहे. दोषींना अटक करण्यात आली असून कामचुकारपणा करणाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कोठडीतील मृत्यूप्रकरणी हायकोर्टाचे जे आदेश आहेत, त्याचं सर्व जिल्ह्यांमध्ये काटेकोरपणे पालन होतं का, याची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी म्हणून तातडीने पीडित कुटुंबीयांची भेट घेतली, अशी माहितीही केसरकर यांनी दिली. संबंधित बातम्या : अनिकेतच्या हत्येचा आरोपी पीएसआय कामटेचा मुजोरपणा कायम गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम? अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या? मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध? सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू