धुळे : धुळ्यात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्यानं दिवाळीच्या उत्साहाला गालबोट लागलं आहे. भीषण आगीत फटाक्यांची दोन अनधिकृत दुकानं जळून खाक झाली आहेत.तर या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे.


धुळ्यातल्या शिरपूर शहरात पाच कंदील चौक परिसरात ही दुर्घटना घडली.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं रस्त्यावर फटाके फोडण्यात येत होते. त्यातल्या एका फटाक्याची ठिणगी उडून दुकानात पडल्याने, दुकानातील सर्व फटाके फुटायला सुरुवात झाली. यात एकमेकाला लागून असलेली दोन दुकानं जळून खाक झाली.

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून, नंदू अग्रवाल असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, न्यायालयाने नागरी वसाहतीत फटका विक्री करण्यास बंदी घातलेली असतांना शिरपूर शहरातील मध्यवर्ती वस्तीत हे अनधिकृत दुकान सुरु होतं. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात फटाका विक्रीस परवानगी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.