साक्री (धुळे) : गेल्या 20 वर्षांपासून बंद असलेल्या 'श्री पांझरा कान सहकारी साखर कारखाना' पुन्हा सुरु व्हावा, अशी मागणी 'पांझरा कान फाऊंडेशन'ने केली. कारखान्याच्या गेटजवळ दिवे लावत कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली.


साक्री तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण, शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊन त्यांनी 'पांझरा कान फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करत कारखाना सुरु करण्याची मागणी हे तरुण करत असतात. यावेळी दिवाळीचं निमित्त साधत त्यांनी गेटवर दिवे लावून आंदोलन केलं.



'श्री पांझरा कान सहकारी साखर कारखाना' बंद होऊन 20 वर्षे लोटली आहेत. गेल्या 16 वर्षांपासून 15 हून अधिक निविदा निघाल्या. मात्र कारखाना सुरु होण्याच्या दिशेने पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. निविदांपर्यंतच गाडा फिरताना दिसतो. त्यामुळे यावेळी 'पांझरा कान फाऊंडेशन'च्या तरुणांनी एकत्र येऊन, कारखान्याच्या गेटवर दिवे लावले आणि 'आता तरी दिवे लावा' असा संदेश संबंधित प्रशासनाला दिला.

'पांझरा कान फाऊंडेशन'च्या जयंतकुमार सोनवणे, धीरजकुमार निकम, पुष्कर शिंदे, कपिल देवरे यांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाला कारखान्याचे माजी कर्मचारी आणि युवक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.



'श्री पांझरा कान सहकारी साखर कारखाना' आर्थिक दुष्टचक्रात अडकल्यामुळे 1996 साली डबघाईला आला, त्यानंतर 2001 ला शेवटचा गळीत हंगाम काढला आणि बंद पडला.  त्यामुळे सुमारे 500 ते 700 कामगार रस्त्यावर आले. साक्री आणि धुळे तालुक्यातील शेतकरी पांझरा कान साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. त्यामुळे कारखाना बंद पडल्याने गेल्या 15 ते 20 वर्षांपासून साक्री तालुक्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.

साक्रीचे पहिले आमदार दिवंगत यशवंतराव देसले यांनी 14 मे 1966 रोजी या कारखान्याची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या कारखान्याचे उद्घाटन केले होते.