मुंबई : एसटी संपाचा आजचा तिसरा दिवस असून, कर्माचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघत नाही आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन अधिकच तीव्र केलं आहे. पण संपावरुन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला जात आहे.
"उद्धव ठाकरे शेतकऱ्यांनासाठी जाऊ शकतात, अंगणवाडी सेविकांसाठी जाऊ शकतात. मग एसटीमधील कर्मचारी पण शेतकऱ्यांनाची मुलं आहेत. अंगणवाडी सेविकांची मुलं आहेत, त्यांच्याप्रती असा दुजाभाव का?" असा सवाल इंटकच्या जयप्रकाश छाजेड यांनी उपस्थित केला आहे.
तसेच परिवहन मंत्र्यांना एसटी संपावर तोडगा काढता आला नाही, हे त्यांचे अपयश आहे. त्यांच्या मनात कर्मचाऱ्यांच्याविरोधात दुष्ट भावना असल्याची टीकाही छाजेड यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्याविरोधात ते कसं बोलतात? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे एसटी संपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे. "उद्धव ठाकरे एसटीबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे," असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरुन टीकेची झोड उठवली आहे. “सत्तेत असून सरकारविरोधी भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेकडे परिवहन खातं आहे. मराठी माणसाचा कौवार मिरवणाऱ्या शिवसेनेने ऐन दिवाळीत मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं आहे. त्यांची सद्य घडीला परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे.”
दरम्यान, राज्यभरात एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाकर रावतेंचं पोस्टर फाडलं. रावतेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली.
तर धुळ्यात परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केलं, आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संबंधित बातम्या
"एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा"
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार?
ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी
प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक
उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलणार का?
अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?
एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच
ST संपाविरोधात हायकोर्टात 2 याचिका, एकाच दिवशी सुनावणी