Hindu Janakrosh Morcha: पुण्यात (Pune News) हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) आज काढण्यात आला. या मोर्चाला पुण्यासह दुरुन लोकं मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. दगडूशेठ मंदिरात आरतीकरुन या मोर्चाला सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच बाकी हिंदू संघटनांचे कार्यकर्ते देखील हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.  लाल महाल येथून मोर्चाची सुरुवात होऊन डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाची सांगता झाली. यावेळी काही लोकांनी भाषणं देखील केली. 


आमदारांसह अनेक दिग्गजांचा मोर्चात सहभाग


आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा यात विशेष सहभाग झाले होते. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळेदेखील या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात महिला आणि युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसला.  विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे सहभागी झाले होते. 


 प्रमुख मागण्या कोणत्या?


-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन (Dharmavir din) म्हणून साजरा करावा.
- प्रेमाच्या नावाखाली सुरु असणाऱ्या लव्ह जिहाद (Love jihad) विरोधात कायदा व्हावा. 
- धर्मांतर होऊ नये, त्यासाठी कायदे करण्यात यावेत. 
-गोहत्या (cow slaughter) थांबवण्यात यावी.
- या सगळ्यांबात कायदे करावे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी.


चौकाचौकात भगवे झेंडे आणि पोस्टर्स


लाल महाल येथून मोर्चा सुरु झाला आणि डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गेला. या मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते . त्याशिवाय मोठ्या प्रमाणात बॅनर्सदेखील लावण्यात आले होते. रस्त्यांच्या दुतर्फा भगवी टोपी परिधान करुन हिंदू एकवटले होते. विविध प्रकारच्या घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली होती.


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. प्रत्येक चौकाचोकात पोलिसांचा ताफा तैनात होता. अशा मोर्चांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली गेली. मोर्चामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूकीत देखील बदल करण्यात आला होता