मुंबई : एबीपी माझाच्या यंदाच्या 'माझा सन्मान' पुरस्कारांचे (Majha Sanman 2023) वितरण झालं. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, डॉ. श्री ठाणेदार, अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांच्यासह दहा जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. एबीपी माझाचा हा सोहळा 21 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.


सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. ज्यांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला, महाराष्ट्रासह देश आणि परदेशातही ज्यांच्या कार्याची दखल घेतली अशा गुणीजनांना 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 


'माझा सन्मान' पुरस्काराचे मानकरी 


श्री ठाणेदार - अमेरिकेतील पाहिले मराठी खासदार 


श्री ठाणेदार… महासत्ता असलेल्या अमेरिकन संसदेतले पहिले मराठमोळे खासदार! श्री ठाणेदार यांचा जन्म बेळगावचा,  पदवीचं शिक्षण मुंबईत, पण कर्मभूमी ठरली ती अमेरिका. 1979 साली ते नोकरीच्या निमित्तानं अमेरिकेत गेले आणि तिथलेच होऊन गेले. 1990 मध्ये दीड लाख डॉलर्समध्ये कंपनी विकत घेत ते उद्योजक बनले आणि पुढच्या काही वर्षातच त्यांनी स्वत:चं उद्योगविश्व उभं केलं. जे हात कधी काळी रोजगार शोधत होते, तेच हात हजारो हातांना रोजगार देणारे झाले. पण त्यांचं ध्येय एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. ते थेट निवडणुकीला उभे राहिले. लोकांचं प्रेम आणि त्यांच्यासाठी काम करण्याची उर्मी यातून ते अमेरिकन संसदेचे सदस्य म्हणून निवडून आले. आज ते मिशिगन राज्यातल्या लाखो नागरिकांचं अमेरिकन संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. मराठी मातीत घडलेले, अमेरिकेत राहून मराठीपण जपणारे आणि परक्या देशात निवडणूक लढवून तिथल्या नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेले हेच श्री ठाणेदार माझा सन्मान पुरस्काराचे सन्मानननीय मानकरी आहेत.


शार्दुल ठाकूर, क्रिकेटर


मुंबईपासून तब्बल 113 किलोमीटरवर वसलेलं पालघर जिल्ह्यातलं माहीम. याच गावानं मुंबई आणि भारतीय क्रिकेटला एक वादळ दिलं, त्या वादळाचं नाव शार्दूल नरेंद्र ठाकूर! त्या वादळाला कुणी पालघर एक्स्प्रेस म्हणतं, तर कुणी 'लॉर्ड शार्दूल'. इयान बोथमच्या तोडीच्या वेगवान अर्धशतकानं त्याला 'बीफी' अशीही उपाधी दिली. ही सारी टोपणनावं शार्दूलला कितीही साजेशी असली तरी खऱ्या अर्थानं तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे. उमेदीच्या वयात भलीमोठी कीटबॅग घेऊन पालघर ते चर्चगेट या लोकलच्या प्रवासात त्यानं एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न होतं आधी मुंबईकडून आणि मग देशाकडून खेळण्याचं आणि त्यानं ते स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं. अर्थातच त्यामागे होती त्याची अपार मेहनत आणि कमालीचा संघर्ष करण्याची हिंमत. म्हणूनच पालघर-मुंबई लोकल ट्रेनमधला हा कॉमनमॅन आज टीम इंडियाचा शिलेदार आणि तुमचा आमचा अभिमानबिंदू बनला आहे. शार्दूल ठाकूरला त्याच्या याच योगदानासाठी 'एबीपी माझा' माझा सन्मान पुरस्काराने सन्मानित करत आलं आहे. शार्दुल तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! 


श्रद्धा कपूर, अभिनेत्री


ती आली… तिने पाहिलं… ती लढली आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. पंडीत पंढरीनाथ कोल्हापुरेंची नात, शिवांगी कोल्हापूरे आणि शक्ती कपूर यांची मुलगी, पद्मिनी कोल्हापूरे यांची भाची एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. 'आशिकी 2' मधल्या 'आरोही'नं प्रेमाची वेगळीच व्याख्या रसिकांसमोर ठेवली, 'एक व्हिलन'मधली 'आयेशा' हूरहूर लावून गेली तर 'स्त्री' मधल्या नाव नसलेल्या भूमिकेनं तिला सिनेविश्वात नवी ओळख मिळवून दिली. आज दोन डझनाहून अधिक सिनेमे तिच्या नावावर आहेत. आई वडिलांकडून श्रद्धाला अभिनयाचा समृद्ध वारसा मिळाला असला तरी, आजोबांचं गाणंही तिनं आपलसं केलं आहे. अभिनय ही तिची पॅशन असली तरी गाणं हे तिचं प्रेम आहे. कोल्हापुरेंचे मराठी संस्कार जपत, कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक हिंदी सिनेसृष्ट्रीत स्वत:चा ठसा उमटवते आहे. तिच्या या प्रयत्नांसाठी आणि आजवरच्या योगदानासाठी एबीपी माझा ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


सुरेश वाघे, साहित्यिक-संशोधक


तब्बल तीस वर्षांच्या तपश्चर्येतून, ध्यासातून आणि संशोधनातून साकारलेल्या संकल्पनाकोशाचे निर्माते. आपण जेव्हा एखाद्या शब्दाचे समानार्थी शब्द शोधायला लागतो तेव्हा, आपली मजल 10-12 शब्दांच्या पलिकडे जात नाही सुरेशजी मात्र 'भूमी' या शब्दाला तब्बल साडेपाचशे समानार्थी शब्द सांगतात. अशा शब्दांनी, त्यांच्या अर्थांनी आणि त्या संपूर्ण संकल्पनेनी संकल्पना कोशाचे पाच खंड सिद्ध झाले आहेत. केवळ संकल्पनाकोशच नाही तर शेक्सपिअर डिक्शनरीच्या धर्तीवर त्यांनी कालिदासशब्दकोश एकहाती सिद्ध केला. आणि आता लवकरच महाराष्ट्रातल्या दागिन्यांचा समग्र इतिहास ते आपल्यासमोर घेऊन येतात. 'माझ्या मराठीचे बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके' अशा आपल्या मराठीची श्रींमती शब्दश: आपल्या समोर मांडणाऱ्या सुरेश वाघे 'एबीपी माझा' कृतज्ञतापूर्वक माझा सन्मान पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 


सत्यपाल महाराज, कीर्तनकार


सत्यपाल महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरीत होऊन समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे समाजप्रबोधक कीर्तनकार. सप्तखंजिरीच्या तालावर आपल्या अस्सल वैदर्भीय भाषेतून जेव्हा ते कीर्तन सुरु करतात तेव्हा ते फक्त कीर्तन उरत नाही तर समाजातल्या अनिष्ठ प्रथांविरुद्धचं झणझणीत अंजन बनतं. सामाजिक विषयांना अध्यात्माची आणि साथीला वादनकलेची जोड दिली की तो विषय लोकांपर्यंत सहज पोहोचतो असं सत्यपाल महाराजांचं म्हणणं आहे. कदाचित म्हणूनच चर्मवाद्यातली खंजिरी त्यांनी हाती घेतली आणि समाजाचं प्रबोधन हिच आयुष्याची वाट ठरली. देशभरातल्या तब्बल 14 हजारांहून अधिक गावात त्यांनी आपली कीर्तनसेवा दिली आहे. त्यांच्या या कार्यासाठी आजवर त्यांना समाजप्रबोधनकार, दलितमित्र, प्रबोधनकार ठाकरे अशा कितीतरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अगदी लहानग्या वयात समाजकार्याचा ध्यास घेऊन संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराजांच्या विचारांची कास धरुन समाजाला शहाणं करण्यासाठी झटणाऱ्या सत्यपाल महाराजांना एबीपी माझाचा सलाम!


वारे गुरुजी, शैक्षणिक


काही दिवसांपूर्वी वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की नाकं मुरडली जायची. पण, आता इथं प्रवेशासाठी तीन वर्षांची वेटिंग लिस्ट आहे. केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवलं आहे. अर्थात त्याचे काटेही त्यांना बोचले. आरोप झाले, बदली झाली. पण, बदली होऊन गेलेल्या जालिंदरनगर शाळेचाही त्यांनी सात महिन्यात कायापालट केला. नवी पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते, त्या ज्ञानमंदिरांना घडवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझा अत्यंत अभिमानाने माझा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


सुरेश वाडकर, संगीत


आपल्या तलम आणि तरल आवाजाने गेली पाच दशकं संगीतविश्वावर आपला अमीट आणि अवीट ठसा उमटवणारे स्वराधिश म्हणजे सुरेश वाडकर. आपल्या मुलाने गायक व्हावं अशी सुरेशजींच्या वडिलांची इच्छा होती. ती इच्छा सुरेशजींनी अशी पूर्ण केली आणि त्यानंतर प्रत्येक पिता आपल्या मुलानं सुरेशींसारखं गायक बनावं अशी इच्छा मनी बाळगू लागला. गुरु जियालाल वसंत यांनी केलेले संस्कार आणि गोड आवाजाचं वरदान, सुरेशजींच्या गाण्यांनी इतिहास रचला नसता तरच नवल. दिवसाची सुरुवात ज्या सुरांनी व्हावी ते 'ओमकार स्वरुपा असो' किंवा मग 'मेरी किस्मत मे तू नही शायद' ही प्रियकराची आर्त वेदना…  सुरेशजींच्या गाण्यांनी प्रत्येक क्षणाची सोबत केली. अवीट सुरांनी आपल्या साऱ्यांचं आयुष्य सुरेल करणाऱ्या, आपल्या गाण्यानं साऱ्यांनाच तृप्त तृप्त करणाऱ्या स्वराधिशाला, आपल्या लाडक्या सुरेश वाडकर यांना एबीपी माझा कृतज्ञतापूर्वक माझा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 


अशोक पत्की, संगीत


जिंगल्सची गुणगुणायला लावणारी धून असो... शीर्षकगीतांचे मनात रुंजी घालणारे स्वर असो... किंवा मग 'टांग टिंग टिंगा'सारखं बसल्या जागी ताल धरायला लावणारं मोरुची मावशीमधलं गाणं… संगीताच्या आकाशात गेली पाच दशकं मुक्त भ्रमंती करणारा आणि सुरेल चालींच्या असंख्य ताऱ्यांनी हे नभांगण सजवणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की. मध्यमवर्गीय गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या अशोक पत्की यांचा पेटीवादक ते संगीतकार हा सूरप्रवास थक्क करणारा आहे. गोवा हिंदू असोसिएशनमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकींसोबत त्यांचे सूर जुळले आणि अशोक पत्कींच्या कारकीर्दीचं संगीत आणखी बहरलं, सुरेल झालं. पुढे 'सप्तसूर माझे' म्हणत त्यांनी साडेपाच हजारांहून अधिक जिंगल्स, 300 हून अधिक शीर्षक गीतं, 500 भावगीतं, 250 हून अधिक नाटकांचं पार्श्वसंगीत अशी विस्मयचकित करणारी स्वरसेवा केली आहे. 'अंतर्नाद' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराचा तुराही आपल्या शिरपेचात खोवणाऱ्या पत्कीकाकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. वयाची 80 पार झाल्यावरही टी-20 च्या जमान्यातील एनर्जीसह फाईव्ह जीच्या वेगाने काम करणाऱ्या या चिरतरुण संगीतकाराला 'एबीपी माझा'चा कृतज्ञतापूर्वक मानाचा मुजरा.


केदार शिंदे, नाटक-सिनेमा


नाटक असो, सिनेमा असो किंवा मग मालिका केदार शिंदे यांच्या कलाकृतीनं रसिकांचं हमखास आणि दिलखुलास मनोरंजन केलं. 'श्रीमंत दामोदरपंत', 'एव्हरग्रीन सही रे सही', छोट्या पडद्यावरचे प्रेमात पाडणारे 'श्रीयुत गंगाधर टिपरे' हाऊसफुल्लचे बोर्ड लावणारा 'अगं बाई अरेच्चा' ते आजही थिएटरमध्ये कोट्यवधींची कमाई करत असलेला 'बाईपण भारी देवा' हा केदार यांच्या कलाजीवनाचा प्रवास जितका यशस्वी तितकाच संघर्षपूर्ण होता. कधी कौतुक झालं, कधी अपयश वाट्याला आलं पण ते काम करत राहिले. शाहीर साबळेंचा वारसा पुढे नेत राहिले. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या, सिनेमाला श्वास मानणाऱ्या आणि बाईपण खरंच कळलेल्या भारी केदार शिंदे यांना ‘एबीपी माझा’चा सलाम.


अशोक जैन, उद्योजक जैन समूह


कुठे पाहाल 'एबीपी माझा सन्मान 2023'?


एबीपी माझाकडून देण्यात येणारा 'माझा सन्मान' 2023 पुरस्कार सोहळा तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात. 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8 वाजता आणि 27 ऑगस्ट रोजी  संध्याकाळी 7 वाजता या सोहळ्याचे प्रक्षेपण 'एबीपी माझा' वाहिनीवर होणार आहे.