मुंबई : आज मराठी भाषा दिन. माय मराठीचे गोडवे गाण्याचा दिवस. यानिमित्त 'एबीपी माझा'नं  ‘माझा साहित्य संमेलना’चं आयोजन केलं आहे. या संमेलनात वेगवेगळे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. ज्यात मराठी कविता, गझल आदी कार्यक्रम होतील.


संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम, गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, बहिणाबाई ते आधुनिक महाराष्ट्रात मराठीला वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज), प्र.के.अत्रे, वि.स.खांडेकर, करंदीकर ते नेमाडे अशा हजारोजणांनी शब्दधन देऊन मराठीला समृद्ध केलं. मराठीचा डंका जगभर उमटवला. शेकडो मराठी शब्दांची भर इंग्रजीत जशीच्या तशी पडली.

पण अलिकडच्या काळात मराठीवर इंग्रजी आणि हिंदीचं अतिक्रमण सुरु आहे. त्यामुळे आपला समृद्ध वारसा मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्या पिढीला समजावून सांगितला पाहिजे. मराठीचा उत्सव साजरा केला पाहिजे. त्यासाठी 'एबीपी माझा'नं  माझा साहित्य संमेलन आयोजित केलं आहे.

ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने दिवसभर ‘माझा’वर वेगवेगळे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. ज्यात मराठी कविता, गझल आदी कार्यक्रमांनी माझाच्या साहित्य संमेलनाला साज चढवतील.

मराठी भाषा दिनाचा उत्सव आणि मराठी भाषेबद्दल आपल्या साहित्याबद्दल, आताच्या अवस्थेबद्दल थोडं आत्मपरिक्षण अशी मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.