मुंबई : सध्या राज्यात तीन पक्षांच सरकार असलं तरी राज्य सरकारचं स्टेअरिंग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास सरकार पुढील पाच वर्षे टिकेल असा विश्वास देखील चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केला.


सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात. तुम्हाला काय वाटतं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री आहे. सरकार चालवण्याचे काम ते करतात. आम्ही आमची मत त्यांच्यासमोर मांडतो परंतु अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो. तो आम्हाला मान्य आहे.


महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्षाकडे दुर्लक्ष होते असे चित्र दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले, तीन पक्षाचे सरकार असल्याने काही मर्यादा येतात. तीन्ही पक्षांनी समजून घेणे गरजेचे आहे. अडचणी वाटल्यास आम्ही त्याबद्दल व्यक्त होतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मार्ग निघतो. तीन पक्षांच सरकार असल्याने काही उणीवा असण्याची शक्यता आहे. त्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न आहे.


विरोधी पक्षांनी कितीही टिका केली तरी हे सरकार पुढील पाच वर्षे टिकणार असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस पक्ष लवकरच महाविकास आघाडीमधून बाहेर पडेल या फडणवीसांच्या वक्तव्यावर चव्हाण म्हणाले, सध्या फडणवीसांची घुसमट होत आहे. राजस्थानमध्ये मनासारखं घडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी घडावे असं त्यांना वाटतं. पण ते महाराष्ट्रात शक्य नाही. आताच्या काळात जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करावे.


धानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या :



राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात, हेच समजत नाही : देवेंद्र फडणवीस