मुंबई: सध्याच्या स्थितीत पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी योग्यच आहे,  असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन- समिट' या कार्यक्रमात बोलत होते.

याशिवाय "मी केवळ फुलटाईम नव्हे, तर ओव्हरटाईम गृहमंत्री आहे. तसंच माझ्याइतका हसतमुख मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नसेल असं म्हणत, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन मांडलं.

'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं चौथं पर्व शनिवारी पार पडलं.

माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन : सर्व मंत्र्यांचे व्हिजन

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन वर्षातील सरकार आणि संबंधित खात्यातील कार्याचा आढावा घेतला. तसंच उर्वरीत तीन वर्षांसाठी काय करणार आहोत, याबाबतची माहिती दिली.

या कार्यक्रमात मंत्र्यांशिवाय विरोधी पक्षातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला. त्यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

मुख्यमंत्र्यांचं व्हिजन

मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हिजनमध्ये सर्वंकष मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सध्या चर्चेत असलेल्या ऐ दिल है मुश्कील सिनेमाच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री म्हणाले, "सीमेवर आपले जवान शहीद होत असताना, पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करु नये, अशी जनभावना आहे. त्यामुळे निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर यापुढे घातलेल्या बंदीचं आपण स्वागत करतो"

याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले, "देशभरात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. पावणेतीन लाख शेतकऱ्यांना विमा कवच दिलं. 80 लाख नागरिकांसाठी मेट्रोचं जाळं उभं करण्याचं ध्येय आहे. तर योग्य तपास करुन सिंचन घोटाळ्यातील दोषींना शिक्षा करु"

याशिवाय "मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मराठा मोर्चातील मागण्यांकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे. मराठा मोर्चे सरकारविरोधी नाहीत, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा आहेत", असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

खड्डे दाखवा, हजार रुपये मिळवा : सा.बां मंत्री चंद्रकांत पाटील

राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील पीडब्ल्यूडीचे रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, "येत्या 15 डिसेंबरनंतर पीडब्ल्यूडीच्या रस्त्यावर खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा".

याशिवाय त्यांनी पीडब्ल्यूडीच्या रस्त्यावर लहान वाहने टोलमुक्त असल्याचंही सांगितलं.

दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर, "मी राजकारणात असूनही महत्वाकांक्षा नसणारा राजकारणी आहे. पण पक्ष जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी स्वीकारेन असं सांगितलं".

राज्य खडखडाटाकडून खणखणाटाकडे नेणार : अर्थमंत्री

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिजन मांडताना राज्य खडखडाटाकडून खणखणाटाकडे नेण्याचं ध्येय आहे, असं सांगितलं. तसंच येत्या तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचं लक्ष्य असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उदयोन्मुख उद्योजकांच्या पाठीशी उभं राहणं, हेच सरकारचं धोरण असल्याचं नमूद केलं.

तर इंग्रजी काळाची गरज, पण मातृभाषा जडणघडणीसाठी महत्त्वाची आहे, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले.

शिक्षण आंदोलनाबाबत तावडे यांनी औरंगाबादमध्ये शिक्षकांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा होता, मात्र आई बहिणीवरून शिव्या देणारे शिक्षक कसे असू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला.

सरकारची कामगिरी निराशाजनक : विरोधक

माझा व्हिजनमध्ये काँग्रेसकडून आमदार नारायण राणे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.

राणे म्हणाले, " सरकारकडून विकासाचं कोणतंही शाश्वत उत्तर नाही. मुख्यमंत्री केवळ घोषणा करतात, अंमलबजावणी कधी होणार? तसंच राणे समितीचा अहवाल ठोसपणे कोर्टात न मांडल्यानेच मराठा आरक्षण रखडलं आहे"

तर जयंत पाटील म्हणाले, " महाराष्ट्र हे सर्वाधिक क्षमता असलेलं राज्य आहे. पण मुंबईच नव्हे तर सर्व राज्यच खड्ड्यांचं शहर बनलं आहे".

याशिवाय मी अर्थमंत्री असतो तर सातवा वेतन आयोग पहिल्याच दिवशी लागू केला असता, असं पाटील यांनी नमूद केलं.

तसंच सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं व्हिजन ठरवणं आवश्यक आहे, सरकार कोणाचं यावरुन व्हिजन ठरू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन

खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा: चंद्रकांत पाटील

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं व्हिजन

काँग्रेस नेते नारायण राणे यांचं व्हिजन

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं व्हिजन

पाकिस्तानी कलाकारांवरची बंदी योग्यच : मुख्यमंत्री

माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन : सर्व मंत्र्यांचे व्हिजन