मुंबई: राज्यातील पीडब्ल्यूडीचे रस्ते 15 डिसेंबरपर्यंत दुरुस्त करण्याचं काम पूर्ण होईल. त्यामुळे राज्यातील रस्त्यांवर 15 डिसेंबरनंतर खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, असं सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, ''राज्यातील सर्वाधिक रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत पीडब्ल्यूडीचे रस्ते खड्डेमुक्त करणार आहोत. पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर 15 डिसेंबरनंतर एकतरी खड्डा दिसला, तर त्याची माहिती देणाऱ्यास 1000 रुपये देणार आहोत.''

तसेच यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर छोट्या वाहनांना टोलमुक्ती केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, ''राज्य महामार्गावरील छोट्या वाहनांना टोल मुक्ती केली असून महाड दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरु आहे. पुलांच्या डागडुजीसाठी 2500 कोटी रुपयांची तरतुद केली'' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यातील मराठा मोर्चानंतर मुख्यमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेवरुन त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ''मी राजकारणात असूनही, महत्त्वकांक्षा नसलेला राजकारणी आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री बनण्याची बिल्कुल महत्त्वकांक्षा नाही. पक्ष देईल ते काम मी करत राहीन.''

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमातील चंद्रकांत पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे  :



  • राज्यातील कोट्यवधी लोक सहकाराशी जोडलेली

  • सहकारातील दोष दूर करुन तो अधिक दृढ करण्याचा सरकारचा प्रयत्न

  • 72 हजार बोगस संस्था बंद केल्या

  • सहकारातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी प्रयत्नशील

  • गेल्या दोन वर्षात साखर कारखानदारांना आधीच्या सरकारपेक्षा मोठी मदत

  • भाजीपाला आणि फळं नियमनमुक्त करण्याचा क्रांतीकारी निर्णय

  • राज्यभरात 200 आठवडे बाजार सुरु

  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्गावर छोट्या वाहनांना टोलमाफी

  • महाड दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट

  •  पुलांच्या डागडूजीसाठी 2500 कोटींची तरतूद

  • फेरफारातील नोंद चुकल्यास अधिकाऱ्याने एका वर्षात निर्णय देणे बंधनकारक, अन्यथा विभागीय चौकशी

  • सरकारचा महसूल वाढण्यासाठी प्रयत्नशील

  • ब्रिटीशकालीन जाचक कायदे बदलण्याचा प्रयत्न

  • वतन जमिन, एनए सारखे जाचक कायदे बदलण्यासाठी प्रयत्नशील

  • डिसेंबरपर्यंत सात बारासाठी सॉफ्टवेअर कार्यरत होणार

  • डिसेंबरच्या अधिवेशनात 10 कायदे मांडणार

  • राज्यातल्या सुतगिरण्या कशा वाढवता येतील याचाही विचार

  • राज्यात सर्वाधिक वापरातील रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न

  • 15 डिसेंबरपर्यंत पीडब्ल्यूडीचे रस्ते खड्डेमुक्त करणार

  • जमिनीच्या भ्रष्टाचाराचे विषय जनतेने लक्षात आणून द्यावे

  • गैरव्यवहार करणाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही

  • पीडब्ल्यूडीच्या रस्त्यावर 15 डिसेंबरनंतर खड्डा दाखवा आणि 1000 रुपये घ्या

  • सहकारातील भ्रष्टाचाराला मिटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न

  • जिल्हा आणि तालुक्याची आवश्यकता लक्षात घेऊन निधी दिला जाणार

  • रस्त्यांसाठीचा निधी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून थेट दिला जाणार

  • 5 हजार जमीन हस्तांतरणाच्या तक्रारी

  • मी राजकारणात असूनही महत्वाकांक्षा नसणारा राजकारणी

  • पक्ष देईल ती भूमिका  घेण्याची तयारी