मुंबई : आरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. आरे संदर्भातील विषय केंद्राकडे आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, सर्व शहरात इलेक्ट्रील बस आणणे आणि शहरातील हवा शुद्ध ठेवणे हा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणाचा समतोल आणि विकास हे आमचे धोरण आहे. आरे प्रकल्प ही एक राजकीय प्रक्रिया आहे. आरेचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निर्णय बदलण्यात आला आहे. या संदर्भात मी फक्त दिल्ली मेट्रोचं उदाहरण देतो. दिल्लीत मेट्रो प्रकल्पासाठी जेवढी झाड तोडली. तेवढीच पुन्हा वाढवली.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राज ठाकरेंच्या भूमीपूजन जल्लोषात साजरा करण्याच्या वक्त्व्याविषयी जावडेकर म्हणाले, अयोध्येला 5 ऑगस्टला राम मंदिराच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दोन-अडीच वर्षात मंदिराचे काम पुर्ण होईल तेव्हा त्याचा जल्लोष करूचं. जनतेसाठी दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे लाईव्ह होणार आहे.