Majha Katta : व्यवसायिक नाटकं करत राहिलो असतो तर मला शंभर नाटकांचं दिग्दर्शन करता आलं नसतं. परंतु, विद्यापीठासोबत संलग्न असल्याने मला हे शक्य झालं. सतत काम करत राहिल्याने नवा विचार करण्याची सवय लागली. त्यातूनच माझ्या हातून शंभर नाटकांचं दिग्दर्शन झालं. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी माध्यमांतर केलं. त्यामुळं नाटकात माझ्यासह खूपच कमी लोक शिल्लक राहिले. त्यामुळे अनेक नाटकं चालून माझ्याकडे आली आणि शंभर नाटकांच दिग्दर्शन करण्याचा मान मला मिळाला, असं ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे (  Vijay Kenkare ) यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा कट्टा (Majha Katta) कार्यक्रमात ते बोलत होते. रंगभूमीवरचे किस्से आणि बरंच काही त्यांनी माझा कट्ट्यावर उलगडून सांगितलं.


कुटुंबातील अनेक लोकांचा नाटकाशी संबंध होता. आई-वडील तर सतत त्यातच व्यस्त असायचे. मला त्यांचा वेळच मिळत नसे. त्याचवेळी काही ही करेन पण नाटकात जाणार नाही, असं ठरवलं होतं. त्यामुळं कॉलेजमध्ये गेल्यानंतर सीए करावं असं डोक्यात होतं. परंतु, विजय गोखले आणि अमृत दामले या माझ्या मित्रांनी मला नाटकात ढकललं. दिवाळीच्या सुट्टीत एका नाटकात काम केलं. ते अभिनेते लक्ष्मीकांत बेरडे यांनी पाहिलं. हे नाटक पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की, माझा भाऊ पुरूषोत्तम बेरडे नाटक करतो, त्यांची भेट घे. मग तिकडे तीन महिन्यांची तामील केली. त्या तीन महिन्यात मला हे माध्यम काय आहे ते समजायला लागलं. तामील सुरू असतानाच पुरूषोत्तम बेरडे यांनी एक एकांकीका दिली आणि त्याचं दिग्दर्शन करायला सांगितलं. ज्या एकांकीचं दिग्दर्शन केलं तीच एकांकीका पहिली आली आणि सर्वोत्तम दिग्दर्शकाचं बक्षीस देखील मिळालं. तेथून मी नाटकांकडं वळलो, असं विजय केंकरे यांनी सांगितलं. 


सत्यदेव दुबे आणि माझ्या वडिलांची मैत्री होती. घरी आल्यानंतर वडील आणि दुबे सतत नाटकांच्याच चर्चा करत असत. गप्पा मारत मारतच ते मला अनेक गोष्टी शिकवून जायचे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या, अशी आठवण केंकरे यांनी यावेळी सांगितली.  


बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीतून शाळेत


रोज शाळेत जाताना बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीतून जात असे. उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि मी एकाच गाडीतून शाळेला जात असे. माझं दर मंगळवारी त्यांच्या घरी जाणं-येणं असायचं. बाळासाहेब ठाकरे हे समोर बसवून कॅरम आणि बुद्धीबळ खेळायला लावायचे. त्यांचे आणि माझे कौटुंबीक संबंध चांगले होते. परंतु, मी कधीच कोणत्या पक्षाचा झालो नाही, असं विजय केंकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.