Majha Katta : प्रत्येक वाद्यामागे एक संस्कृती असते. त्या संस्कृतीचा ठेवा वाचवण्यासाठी 'फोक्स वॅगन' प्रोजेक्ट सुरू केला असल्याची माहिती लोकवाद्य संग्राहक, संगीतकार मधुर पडवळ यांनी दिली. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात मधुर पडवळ यांनी देशविदेशातील 80 वाद्यांची ओळख प्रेक्षकांना करून दिली. कोणतीही वाद्ये शिकणे हे आव्हानात्मक असते अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. माझा कट्ट्यावर मधुर पडवळ यांनी देशविदेशातील वाद्यांची ओळख करून दिली. 


गेल्या 18 वर्षांपासून मधुर पडवळ हे देशभरात फिरतात आणि दुर्मिळ होत चाललेल्या लोकवाद्यांचा अभ्यास करतात. सध्याच्या घडीला देशाच्या कानाकोपऱ्यातली, सर्वांना परिचित, अपरिचित असलेली, काही विस्मरणात गेलेली लोकवाद्य वाजवण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. देशभरातील लोकवाद्य जगवण्यासाठी, त्यांच्या प्रसारासाठी मधुर यांनी 'फोक्स वॅगन' नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्ट मधून देशातल्या ट्रायबल आणि फोक आर्टिस्टला एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


जवळपास 80 वाद्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. ही दुर्मिळ वाद्ये त्यांनी आपल्या आवडीतून जमा केली. मधुर यांनी फक्त ही वाद्ये संग्रही ठेवली नाहीत तर ती वाजवण्याची कलादेखील त्यांना अवगत आहे. लोप पावत चाललेल्या वाद्यांना जपणारा अवलिया अशी त्याची ओळख झाली आहे. घरातून कोणताही संगीताचा वारसा नसताना मधुर पडवळ यांची संगीतात रूची निर्माण झाली. त्यातून काहीतरी स्वत: च्या हिंमतीवर वेगळे करण्याचे धाडस केले असल्याचे त्यांनी सांगितले. मधुर पडवळ यांनी 'माझा कट्टा'वर आपल्या लोकसंगीताच्या प्रवासाबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वाद्ये जमवताना त्या ठिकाणची संस्कृती, भाषा, गीते यांचाही अभ्यास केला. वेगवेगळ्या प्रदेशात असणारी वाद्ये, उपलब्ध असणारी प्राणी आणि त्यांचे चामडे यावर त्या भागातील वाद्ये, त्यांचा प्रकार आणि आवाज ठरतो असेही मयूर यांनी सांगितले.


फक्त वाद्य खरेदी नव्हे शिकण्यावर भर


प्रत्येक वाद्यावर वातावरणाचा फरक होतो. त्यामुळे ही वाद्ये संग्रही घेण्याआधी किमान 25 दिवस तरी संबंधित लोक कलाकार, आदिवासींसोबत वास्तव्य करतो असे त्यांनी सांगितले. या कालावधीत वाद्य कसे तयार करतात, त्यात बिघाड झाल्यास कशी दुरुस्ती करावी हे शिकून घेतले. त्याचा फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 


अनेक ठिकाणी वाद्यांना देवाचा दर्जा


अनेकांना घरांमध्ये या पारंपरीक वाद्यांना देवाचा दर्जा असतो. त्यामुळे ही वाद्ये ती कुटुंबे विकतही नाही अथवा इतरांना देत नाही. राजस्थानमध्ये एका कुटुंबाला माझंदेखील संगीतावर प्रेम आहे हे पटवून दिले. त्यासाठी माझ्याकडील असलेली गिटार वाजवून त्यांना ही बाब पटवून दिली. काही दिवस त्यांच्या सोबत राहिलो होतो, त्यातून विश्वास निर्माण झाला असल्याचे मयूर पडवळ यांनी सांगितले. 


राजस्थानमधील त्यांनी अनुभवाबाबत सांगितले. एक वाद्य खरेदी करायचे होते. मात्र, त्यांना देण्यासाठी पुरेसे पैसे खिशात नव्हते.  मी स्वत: टॅटू आर्टिस्ट आहे. टॅटू काढून काही कमाई केली आणि त्यातून वाद्य खरेदी केली असल्याची आठवण त्यांनी सांगितली.  


पाहा माझा कट्टा : लोकवाद्यांचा जादूगर मधुर पडवळसोबत खास संवाद