Majha Katta With Bachchu Kadu : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी टीका केली त्याचं वाईट वाटत नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीचे शब्द वापरले ते योग्य नाही असं प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले. बच्चू कडू यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर (Majha Katta) हजेरी लावली. यावेळी त्यांनी संवाद साधला. मी माझ्या आयुष्यात पैशाला कधीच स्थान दिलं नाही. जेवढा आवश्यक आहे तेवढाच पैसा खर्च केला असे कडू म्हणाले. ज्यावेळी सत्तेतला माणूस अशा प्रकारचे आरोप करतो, त्यावेळी वेदना होतात असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. 


एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बच्चू कडू यांनी विविध मुद्दे मांडले. हे सत्तांतर करण्यात बच्चू कडू यांची भूमिका काय होती. बंड यशस्वी झाल्यानंतर नवीन मंत्रीमंडळात त्यांना स्थान नसणे. त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय नेमका का घेतला? त्यांना नेमकं काय हवं आहे? रवी राणांनी केलेल्या आरोपांना त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं? यासंदर्भात सविस्तर माहिती बच्चू कडू यांनी माझा कट्ट्यावर दिली. हा कट्टा उद्या (29 ऑक्टोबर शनिवार) सकाळी 10 वाजता प्रसारीत केला जाणार आहे. यावेळी आपल्याला बच्चू कडू नेमकं काय म्हणाले, सत्तांतरावर त्यांच नेमकं म्हणणं काय ते ऐकता येणार आहे.


रवी राणा यांच्याबाबत पुढची नेमकी भूमिका काय ?


एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं आनंदाचे नव्हते. कारण एखाद्या बांधलेल्या घरातून जाताना दु:ख होतेच असे कडू यावेळी म्हणाले. दरम्यान गेल्या 100 दिवसांमध्ये सरकारनं काही चांगले निर्णय घेतल्याचे देखील कडू म्हणाले. मुख्यमंत्री मैदानावरचा कार्यकर्ता असल्याचे कडू म्हणाले. यावेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांनी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? याबाबतची माहिती देखील दिली. तसेच रवी राणा यांच्याबाबत पुढची नेमकी काय भूमिका असेल याबाबत देखील बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत बच्चू कडू यांची नेमकी भूमिका काय? याबाबतची माहिती देखील माझाच्या कट्ट्यावर बच्चू कडू यांनी दिली.


रवी राणांचे नेमके आरोप काय?


आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय हा 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत 'एका बापाचा असन, त त्येनं पुरावे द्यावे. आरोप सिद्ध झाला त त्येच्या घरी भांडे घासाले जाईन,' असे आव्हान बच्चू कडूंनी दिले. यासाठी त्यांनी 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटमही राणांना दिला. तसेच खुलासा केला नाही तर आम्ही धमाका करु, असाही इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. यासाठी आमदार कडूंनी नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. 


फुटलेल्या फटाक्यांपैकी 'हा' फुसका फटाका


बच्चू कडू यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार रवी राणा यांनी ट्वीट करुन बच्चू कडूंना प्रत्युत्तर दिले आहे. हा एक विझायला आलेला दिवा आहे आणि दिवा विझायच्या आधी फडफड करतो आणि दिवाळीत फुटलेल्या फटाक्यांपैकी 'हा' फुसका फटाका आहे, असे बच्चू कडूंना उद्देशून राणांनी म्हटले आहे. आता हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. बच्चू कडू आता कोणत्याही थराला जायला तयार आहेत. कारण 'हा माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न आहे', असे म्हणत त्यांनी कुणी कितीही फटके देण्याचा प्रयत्न केला तरी मागे हटणार नाही, असे काल सांगितले. त्यावर रवी राणांचे ट्वीट महत्वाचे ठरत आहे.