अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात 'खोके' घेतल्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता महिला मुक्ती मोर्चा संघटनेने देखील या वादात उडी घेतली आहे. दोन आमदारांच्या वादात महिलांचा विनाकारण अपमान होत असल्याची तक्रार महिला मुक्ती मोर्चाने दिली आहे. यावरून आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आमदार रवी राणा यांच्याबाबत टीका करताना बच्चू कडू यांनी महिला वर्गाचा अपमान केलाय असा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा संघटनेकडून बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद चालू आहे. याताच बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यामुळे त्यांच्यातरी हा वाद टोकाला गेलाय. राणा यांच्या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी राणा यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंडसंविधानातील कलम 501 अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन पैसे घेतले असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यानंतर राणा यांनी याबाबतचे पुरावे द्यावे असे आवाहन बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी महिलांबाबत तसेच तृतीय पंथियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे, असा आरोप महिला मुक्ती मोर्चाकडून करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप देखील महिला मुक्ती संघटनेने केलाय. त्यामुळेच महिला मुक्ती मोर्चाने बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
"रवी राणा जर एका बापाची औलाद" असतील तर त्यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे अन्यथा आम्ही त्यांना 'हिजडा' म्हणून घोषित करू, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. याबरोबरच राणा यांनी पुरावे दिले तर त्यांच्या घरची भांडी घासू असंही बच्चू कडू म्हणाले होते. बच्चू कडू यांच्या याच वक्तव्याविरोधात महिला मुक्ती मोर्चा संघटनेने तक्रार दिली आहे.
दरम्यान, रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा मोठा धमाका करु असा इशारा देखील बच्चू कडूंचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलाय.