Majha Katta : मराठी भाषा आणि मराठी साहित्यातल्या ज्ञात - अज्ञात कविता सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्यासानं हातातली नोकरी सोडत विसुभाऊ बापट यांनी एकपात्री प्रयोगांची सुरुवात केली. गेली चार दशकं विसुभाऊ न थकता, न कंटाळता देश-विदेशात फिरत आहेत. कवितांचे एकपात्री प्रयोग सादर करत आहेत. शेकडो कवितांतले बारकावे आणि त्यातील सौंदर्य उलगडून सांगत आहेत. सुपरिचित कवी, नवोदित कवितांच्या कवितांचे 3 हजारांपेक्षा अधिक प्रयोग करत त्यांच्या कवितांचं कुटुंब अधिकच मोठं होत आहे. हजारो कविता मुखोद्गत असलेल्या विसुभाऊ बापट यांनी माझा कट्ट्यावर हजेरी लावली आहे. 


इतर कवींनी लिहिलेल्या कवितांवर संपादकीय संस्कार करण्याची आवश्यकता वाटायची, त्यामुळे कवितांचा अभ्यास सुरू केला. कवितांचा अभ्यास करत असताना कवितांवर संस्कार केले गेले. त्या कविता विसुभाऊ त्यांच्या संग्रही ठेवायचे. अनेक अपरिचित कविता त्यांच्या संग्रही असल्याने त्या कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा वसा विसुभाऊंनी घेतला. प्रस्थापित कवींच्या अपरिचित कविता आणि अपरिचित कवींच्या अप्रतिम कविता याची गुंफण म्हणजे 'कुटुंब रंगलंय काव्यात' असे विसुभाऊ बापट माझा कट्ट्यावर म्हणाले. 


45 तास सलग रसिकांना कविता ऐकवू शकतील इतक्या कविता विसुभाऊ बापट यांना पाठ आहेत. लहानपणापासून पाठांतराची सवय असल्याने त्यांना कविता पाठ करणे अवघड गेले नाही. विसुभाऊंनी वयाच्या सहाव्या वर्षी कीर्तनात एक कविता सादर केली होती. 'मी अत्रे बोलतोय' कार्यक्रम कराणारे सदानंद जोशी आणि 'वऱ्हाड निघालंय लंडनला' कार्यक्रम करणारे लक्ष्मणराव देशपांडे हे दोघे विसुभाऊंचे आदर्श होते. त्यामुळेच 'वऱ्हाड निघालंय लंडनला'प्रमाणे 'कुटुंब बसलंय काव्याला' असा कार्यक्रम करण्याचे विसुभाऊंनी ठरवले. 
'कुटुंब रंगलंय काव्यात'चा पहिला कार्यक्रम 26 जानेवारी 1981 रोजी अहमदनगर क्लबमध्ये पार पडला. 


चांगल्या कविता ऐकण्याची सवय लोकांना लावली गेली पाहिजे. त्यामुळे मी 'कुटुंब रंगलंय काव्यात' कार्यक्रमाची सुरुवात केली. अपरिचित कविता ऐकताना रसिक आनंदी होत असतात. चांगल्या कविता रसिकांपर्यंत पोहोचल्या गेल्या तर रसिक नक्कीच दाद देतील, असे मत विसुभाऊ बापट यांनी माझा कट्ट्यावर मांडले. येत्या 26 जानेवारीला विसुभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगलंय काव्यात' कार्यक्रमाला 40 वर्ष पूर्ण होणार आहेत.