G20 and COP26 Summit : जी 20 परिषदेसाठी इटलीच्या रोममध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इटलीमधील भारतीयांची भेट घेतली. यावेळी त्यांची भेट मूळचे नागपूरचे आणि गेली 2 दशके इटलीत राहणारे महेंद्र शिरसाट उर्फ माही गुरुजी यांनी घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत मराठीत संभाषण केलं याला मोदींनी देखील मराठीत उत्तरं दिली. तसेच मराठीत संवाद साधत मोदींनी देखील त्यांची माहिती विचारली.
मोदींनी माही गुरुजी यांना मराठीत उत्तरं देत त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलं. माही गुरुजी इटलीत योगा आणि आयुर्वेदचा प्रचार प्रसार करत असून पुढे इटलीमध्ये आयुर्वेदाच्या प्रचारासाठी मदत करावी अशी विनंती मोदींकडे केली तेव्हा मोदींनी त्यांना सकारात्मक उत्तर दिलं. हे महेंद्र शिरसाट उर्फ माही गुरुजी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मतदान करण्यासाठी इटलीवरून नागपुरात आले होते.
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर जमलेल्या अन्य नागरिकांनी मंत्रोच्चार केला. त्यानंतर माही गुरुजींनी मोदींकडे सरकारच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या प्रसारासाठी मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदींनीही त्यांना चांगलं काम करत असल्याचं म्हणत कौतुक केलं. यावेळी जमलेल्या नागरिकांनी आपापल्या भाषेत मोदींशी संवाद साधला, त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि इटलीच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान ते G-20 देशांच्या शिखर संमेलनात भाग घेणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता G20 बैठक ही व्हर्च्युअल स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. G20 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान जगातल्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था रुळावर आणण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुधारासाठी महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी G20 हे सर्वात महत्वाचं व्यासपीठ मानलं जातं.