CM Eknath Shinde : तळपत्या सूर्याप्रमाणे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) जाळून टाकायची आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कोल्हापूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. मान गादीला आणि मत मोदीला असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. संजय मंडलिक यांनी कधी कोणाला त्रास दिलाय का? हा साधा सरळ माणूस आपल्याला दिल्लीला पाठवायचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
24 तास काम करणारा पंतप्रधान पाहिजे की परदेशात जाऊन गार गार वारा खाणारा?
काँग्रेसचे उमेदवार मतदारसंघ सोडून पळत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 2014 नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशासाठी 24 तास काम करणारा पंतप्रधान पाहिजे की परदेशात जाऊन गार गार वारा खाणारा पाहिजे? असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला. 4 तारखेला या काँग्रेसचा बदला घेणार आहेत ना आपण? असा सवालही त्यांनी केला. स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी काँग्रेसला डोक्यावर घेतलं. आज आमच्या सरकारमध्ये सर्व जाती धर्माचे मंत्री आहेत. हसन मुश्रीफ इथं मंत्री आहेत असे ते म्हणाले. विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते टिकवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
फेसबुकवर बोलणाऱ्या व्यक्तीला मतदान करणार आहोत का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
मोदींनी 10 वर्षात केलेलं काम आणि 60 वर्षे काँग्रेसने देशाला खड्ड्यात घातलेला काळ पाहा असेही मुख्यमंत्री म्हणाले. घरात बसलेल्या व्यक्तीला मत देणार का? फेसबुकवर बोलणाऱ्या व्यक्तीला मतदान करणार आहात का? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
कोल्हापुरातील दोन्ही जागा मोठ्या फरकाने महायुती जिंकेल
विरोधक एक एक वर्षाचा पंतप्रधान करायचं म्हणतात, ही काय महापालिका आहे का? असेही ते म्हणाले. हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, संजय मंडलिक असा त्रिवेनी संगम इथं झाला आहे. त्यामुळं कोल्हापुरातील महायुतीच्या दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये महायुतीला प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद तिसऱ्या फेजमध्ये देखील मिळेल. कडक उन्हाळा असून देखील महायुतीचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम आणि महायुतीने महाराष्ट्रात केलेले काम याची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय महायुती कोणताही प्रकल्प करत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानामुळे आदमापूरचे बाळूमामा मंदिर दोन दिवस बंद राहणार; 7 मे रोजी मतदान