मुंबई : कोणत्याही राज्याची विधानसभा निवडणूक म्हटली की त्यात सर्वात मोठा प्रश्न असतो तो मुख्यमंत्रिपदाचा आणि ते स्वाभाविकही आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून बरीच वादावादी झाली. महायुतीत मात्र तुलनेनं त्या मुद्द्यावरून शांतता आहे. निवडणुकीनंतर एकत्र बसून ठरवू असं महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांचे नेते आधीपासून सांगतायत. अर्थात भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत पातळीवर काहीतरी शिजतंय की काय अशी शंका अधूनमधून येतेच. पण, या सगळ्यात एक नाव ट्विस्ट आलाय तो देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यानं आणि त्यावरुन रंगलंय नवं राजकारण.
मुख्यमंत्रिपदाची शर्यत नसल्याचा फडणवीसांचा दावा
आज घडीला महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाचा उद्देश हा मुख्यमंत्रिपद मिळवणे हाच असल्याचं दिसतंय आणि त्याच्याच प्रचाराचा धुरळा राज्यभरात उडतोय. पण असं असलं तरी सत्तेत असलेल्या महायुतीतील सर्वात जास्त जागा लढणाऱ्या भाजपचा राज्यातले कॅप्टन देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी सीएमपदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्री स्ट्राईक रेटवरही ठरणार नाही. मुळात अशी शर्यतच नाही असं फडणवीस म्हणाले.
अजित पवारांचीही शर्यतीतून माघार?
देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य ऐकल्यावर एक गोष्ट नक्की सांगता येते. ती म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून आज घडीला महायुतीत कोणाताही फॉर्म्युला नाही, कोणतीही शर्यत नाही, कोणताही संघर्ष नाही असाच मेसेज मतदारांपर्यंत पोहोचवायचाय. कारण, अशीच काहीशी भूमिका त्यांच्या मित्रपक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मांडलीय. आमच्या 175 जागा येतील आणि एकत्र बसून मुख्यमंत्रिपदावर चर्चा करु असं अजितदादांनी म्हटलंय. कधीकाळी मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा उघड उघड बोलून दाखवणारे अजित पवारही म्हणतात की, ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत.
खरंतर, महाराष्ट्राच्या विधानसभा जाहीर झाल्या तेव्हा सगळ्याच नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकू लागले होते. महाविकास आघाडीत तर उद्धव ठाकरेंनी भर सभांमधून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी वारंवार केली. त्यावरुन मविआतील संघर्षाच्या कहाण्याही महाराष्ट्रानं पाहिल्यात.
तावडेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा ट्विस्ट
महायुतीपुरतं बोलायचं झालं तरा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी एक वक्तव्य केलं आणि कहाणीत ट्विस्ट आला. मुख्यमंत्रिपदासाठी ऐन वेळी नवा चेहरा समोर येऊ शकतो असं तावडे म्हणाले. तावडेंनी मुख्यमंत्रिपदावरून वक्तव्य केलं आणि महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन अंतर्गत पातळीवर काहीतरी शिजतंय की काय, अशी चर्चा सुरु झाली. मतदानाच्या आधी मुख्यमंत्रिपदावरून जाहीर वाद नको असा विचार फडणवीसांनी केला असावा.
माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे. कधी कधी कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. त्यात काही गैर नाही. सध्या तरी मी माझ्या पक्षाचे आदेशच फॉलो करणार असं फडणवीसांनी म्हटलंय. मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेवरून महायुतीत दुमत नको आणि विरोधकांना आयतं कोलीत मिळता कामा नये असा विचार फडणवीसांनी केलेला दिसतोय.
सध्या हे असं चित्र दिसत असलं तरी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोण कोण आहे हे 23 नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. कारण बहुमत महायुतीला मिळतं की महाविकास आघाडीला हे तेव्हाच कळणार आहे.
ही बातमी वाचा: