Mahavitaran Strike Against Privatization : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास. मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे.
नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून महावितरण, महानिर्मिती या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने या सर्व संघटनांना नोटीस दिली आहे. यात त्यांनी मेस्मा लावणार असल्याचं सांगितलं आहे. या अत्यावश्यक सुविधेत अडचण निर्माण करून वीज कर्मचारी संपावर जात असतील तर त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, अशी विनंतीही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी मेस्मा कायद्याचं उल्लंघन केलं, तर मग यातील कर्मचारी आणि अधिकार्यांवर कारवाई केली जाणार आहे.
यातच या मेस्माच्या नोटीस संदर्भात 'एबीपी माझ्या'च्या प्रतिनिधींनी वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधाल असता ते म्हणाले आहेत की, त्यांनी नियमानुसार 15 दिवस आधी राज्य सरकाराला या संदर्भात नोटीस दिली आहे. त्यामुळे आम्ही नियमानुसार हे आंदोलन करणार आहोत. तसेच राज्य सरकराने आमच्यावर मेस्मांतर्गत कारवाई केली तरी आम्ही मागे हटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये : महावितरण
या संपाबाबत महावितरणने म्हटलं आहे की, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर विविध परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर 24 तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.