बीड : सर्वत्र दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गावावर मात्र शोककळा पसरली आहे. महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या वरवटी येथील तरुणाचा मृत्यू झालाय. लाईनमन मेघराज व्यंकटी चाटे (वय, २८) असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कर्तव्य बजावत असताना विद्युत तारेला चिकटून त्यांचा मृत्यू झाला.
दिवाळीत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी दिवाळी असूनही महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. कुठे बिघाड झाला तरी शक्य तेवढ्या कमी वेळात विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला जात आहे. रविवारी दुपारी आंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तलावाशेजारी असलेल्या क्रांतीनगर फिडरमध्ये बिघाड झाला होता. दुरुस्तीसाठी मेघराज चाटे हा तरुण लाईनमन विद्युत खांबावर चढला होता. त्यापूर्वी बंद केलेला विद्युत पुरवठा अचानक सुरु झाल्याने मेघराज यास विजेचा जोरदार झटका बसला. त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित करून मेघराज यांना खाली उतरवून तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मेघराज यास मयत घोषित केले.
दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त
ऐन दिवाळीत चाटे कुटुंबियांच्या घरातील दिवा विझला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच मेघराज चाटे यांचा विवाह झाला होता. त्यांच्या मृत्यूने अवघ्या दोन महिन्यांचा त्यांचा संसार उद्धवस्त झाला आहे. मेघराज यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महिन्यात दुसरी घटना
दरम्यान, मागच्या महिन्यात देखील बीडमध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे विजेच्या तारेला चिटकून आईसह दोन लेकरांचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली होती.
गेवराई तालुक्यातील राठोड वस्तीवरील दोन लहान मुले शेतात खेळत होती. यावेळी शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागला. त्यामुळे ही दोन्ही मुले खाली पडली. हे पाहता त्यांनी आई त्यांना वाचवण्यासाठी आईने धाव घेतली. परंतु, आईला देखील शॉक लागला आणि या घटनेत तिघांचा दुदैर्वी मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या