सांगली : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार अकरा दिवसात कोसळेल असं भाकीत केलं होतं. नारायण यांच्या भाकीतात चार दिवस वाढवून हे सरकार 15 दिवसात कोसळेल असं भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, त्यामुळे शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावं. आपण मिळून सरकार बनवू, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं आहे.


महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांचा समावेश आहे. तिन्ही पक्षांमध्ये वैचारिक वाद आहेत. तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने संघर्ष होत आहे. त्यामुळे हे सरकार फास काळ टिकेल असं वाटत नाही. नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे हे सरकार 11 दिवसात नाही तर 15 दिवसात कोसळेल असं रामदास आठवले यांनी म्हटलं.


ठाकरे सरकार अकरा दिवसांत कोसळणार; नारायण राणे यांचं भाकीत


रामदास आठवले यांनी यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची केलेली घोषणा फसवी निघाली आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी आणि एनपीआर याबाबत बोलताना एनआरसी फक्त आसाम पुरती लागू होती आणि ती इतर कोणत्याही राज्यात लागू होणार नाही. त्यामुळे कोणत्याच नागरिकांचं नागरिकत्व धोक्यात येणार नाही. मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लीम समाजात गैरसमज निर्माण करत आहे. मात्र हा कायदा देशातील मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही. जर या देशातल्या मुस्लीम समाजावर अन्याय होत असेल तर आपण मुस्लीम समाजाच्या बाजूने स्वतः उभे राहू, असं आश्वासनही रामदास आठवले यांनी यावेळी दिलं.


राज्यसभेच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना आठवले म्हणाले की, उदयनराजे भोसले आणि संजय काकडे हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र कोणाला उमेदवारी मिळणार हे मला माहित नाही. दोघांपैकी कुणाला राज्यसभेत पाठवायचं हा भाजपचा निर्णय असणार आहे. मात्र मला 100 टक्के उमेदवारी मिळणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Narayan Rane | "पुढील अकरा दिवसात राज्यातलं सरकार कोसळेल - नारायण राणे