मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने आज राज्यभर आंदोलन पुकारलं. गेल्या तीन महिन्यात महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक लोकहिताचे निर्णय रद्द केले आहेत. तसेच शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी आहे, त्याचबरोबर राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर भाजपाकडून आंदोलन करण्यात आली. भाजपचे सर्व आमदार मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. सामान्य जनतेनीही या आंदोलनाला प्रतिसाद देत महाआघाडी सरकारच्या विरोधातील असंतोष प्रकट केला, असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.


राज्यात 355 ठिकाणी अडीच लाखांहून अधिक लोक महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते. हिंगणघाट, मुंबई, पुणेसह छोट्या गावांमध्येही लोकांनी आंदोलन केली, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी हे सरकार आलेले नसून हे फसवणूक करणारं सरकार आहे. या सरकारला दूरदृष्टी नाही. हाच रोष लोकांच्या मनात आहे, म्हणून आज लोक रस्त्यवर उतरले, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफी 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार मात्र 15 शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर केली. मात्र या वेगाने गेले तर 460 महिने लागतील, अशी टीका ही चंद्रकांत पाटलांनी केली.


महाआघाडी सरकार एक-एक करुन भाजप सरकारच्या कल्याणकारी योजना रद्द करत आहे. जनादेशाचा घात करत स्थापन झालेल्या या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा एक रुपयाचीही जादा मदत महाआघाडी सरकारने दिलेली नाही. महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. निष्क्रिय आणि फसवाफसवी करणाऱ्या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन भाजपनं केलं.


सरकारला धडकी भरेल असं आजचं आंदोलन होतं. लोक या सरविरोधात आहेत म्हणून ते आज रस्त्यावर उतरले होते. आज संध्याकाळी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. कोल्हापूरचे भाजप अध्यक्ष समरजीत घाडगे यांनी जिल्ह्यात फिरून राज्यपालांना पत्र लिहिण्याचं लोकांना आवाहन केलं होतं. अशी 52 हजार पत्र त्यांनी गोळा केली. त्यातली काही पत्र लोकांनी आपल्या रक्ताने लिहिली आहे. यातून लोकांचा सरकारविरोधातील संताप दिसून येतो. ही सर्व पत्र घेऊन समरजीत घाडगे मुंबईत आले आहेत. ही पत्र आम्ही राज्यपालांना सुपुर्द आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.