मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. तीच रणनिती आखून भाजपला जिल्हा परिषदांपासूनही दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरु केला आहे. त्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन केला जाणार आहे. तिन्ही पक्षांची ही रणनिती यशस्वी ठरली तर भाजपला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.


राज्यातील 25 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने एकत्र येण्याच्या हालचाली सुरु केला आहेत. सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही एकत्र लढवण्याची तयारी या तिन्ही पक्षांनी केली आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे आहे. या समितीमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि खासदार विनायक राऊत, काँग्रेसतर्फे मोहन जोशी, कल्याण काळे आणि राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांचा समावेश आहे.


येत्या 30 डिसेंबर ते 5 जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणार आहेत. 25 जिल्हा परिषद निवडणुका आहेत, त्यातील जास्तीत जिल्हा परिषदा जिंकण्याचे प्रयत्न हे तिन्ही पक्ष करतील. सध्या 13 जिल्हा परिषदांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे. मात्र हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपाला मोठा धक्का बसू शकतो.