मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्यानंतर दुसरीकडे या वादात आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सुद्धा उडी घेतली आहे. महात्मा गांधींना मारण्यासाठी नथुराम गोडसेला सावरकरांनी बंदूक पुरवली होती असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. तुषार गांधी यांनी हा आरोप ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. 


तुषार गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सावरकर यांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंना मारण्यासाठी नथुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासाठीसु्द्धा मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे कुठलंही शस्त्र नव्हतं."


 






राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान सावरकरांवर काही आरोप केले होते. त्यानंतर आता तुषार गांधी यांनीदेखील सावरकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 


काय आहे ट्वीट? 


तुषार गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "1930 मध्ये बापूंना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला, विदर्भात बापूंच्या हत्येचा कट रचल्याची पूर्वसूचना दिली आणि बापूंचे प्राण वाचवले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटना आणि त्यांच्या नेतृत्वाला बापूंवर हल्ला न करण्याचा जाहीर इशारा दिला. सावरकर आणि हेडगेवार हे सनातनी हिंदूंचे नेते होते. म्हणून प्रबोधनकारांचा इशारा त्यांना उद्देशून होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या या इतिहासाची आठवण करून दिली पाहिजे. सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला एक सक्षम बंदूक शोधण्यातही मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत गोडसेकडे गांधींची हत्या करण्यासाठी शस्त्र नव्हते."


 


काय म्हणाले तुषार गांधी? 


या ट्वीटनंतर तुषार गांधी यांनी एबीपी माझाला यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मी कोणताही नवीन आरोप करत नाही, कपूर कमिशनच्या अहवालामध्ये ज्या गोष्टी नमूद आहेत तीच मी सांगतोय. महात्मा गांधी यांच्या हत्येपूर्वी, दोन तीन दिवस आधी नथूराम गोडसे हा विनायक सावरकर यांना भेटला. तोपर्यंत त्याच्याकडे बंदूक नव्हती.  बंदूक शोधण्यासाठी तो मुंबईभर फिरत होता. या दोघांची भेट झाल्यानंतर ते दोघेही पहिला ग्वाल्हेरला गेले, त्यानंतर दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये त्यांनी परचुरे या व्यक्तीची भेट घेतली. परचुरे याने त्यांना त्यावेळची सर्वात चांगली पिस्तूल दिली. नंतर याच बंदूकीच्या माध्यमातून नथूरामने गांधीजींची हत्या केली."