Mahashivratri 2023 : आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) उत्साह साजरा करण्यात आला. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्तांनी मनोभावे पूजा केली, उपवास केले. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख, संपत्ती, धन लाभते असे सांगितले जाते. आज देशभरात महाशिवरात्रीनिमित्त कोणकोणत्या ठिकाणी महाशिवरात्री कशी साजरी केली याचा आढावा घेऊयात.
1. महाशिवरात्रीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शंकराची मनोभावे पूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाशिवरात्रीनिमित्त ठाणे शहरातील किसान नगर येथील शिव मंदिराला भेट देऊन भगवान शंकराची मनोभावे पूजा केली. राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचे मागणे यावेळी त्यांनी शिवशंकराकडे मागितले.
2. महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर ज्योर्तिलिंग परिसरात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते महापूजा पार पडली
महाशिवरात्रीनिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत भीमाशंकर ज्योर्तिलिंग परिसरात शासकीय महापूजा पार पडली. बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणून भीमाशंकर येथे भाविक मोठया संख्येने येत असतात. रात्री बाराच्या सुमारास दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ही महापूजा पार पडली.
3. सोमेश्वरांच्या पालखी यात्रेत धनंजय मुंडे यांचा सहभाग; स्वतः खांद्यावरून वाहिली सोमेश्वरांची पालखी
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातल्या जिरेवाडी येथील श्री सोमेश्वरांच्या पालखी सोहळ्यात उपस्थिती लावली. यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी पालखी खांद्यावर घेऊन ते पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री सोमेश्वरांची पालखी जिरेवाडीतून परळीतल्या वैजनाथ मंदिरात येत असते. यावेळी मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिक या पालखी यात्रेमध्ये सहभागी होतात आणि आज आमदार धनंजय मुंडे हे देखील या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.
4. आमदार नितेश राणेंनी केली कुणकेश्वराची पहिली पूजा
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रा आजपासून तीन दिवस आहे. कोरोनानंतर प्रथमच खुल्या स्वरुपात ही यात्रा होत आहे. यावर्षी 10 ते 12 लाख भाविक या यात्रोत्सवाला येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्थानिक आमदार नितेश राणे यांनी रात्री पहिल्या पूजेचा मान मिळाला असून त्यांनी रात्री कुणकेश्वराची पूजा केली.
5. महाशिरात्रीनिमित्त शेगावात अनोखं 12 ज्योतिर्लिंगांचं प्रदर्शन, भाविकांची मोठी गर्दी
आज महाशिरात्रीनिमित्त शेगाव शहरात प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यलयाच्या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंगांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. महाशिरात्रीनिमित्त एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होत असल्याने या प्रदर्शनाला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन या ठिकाणी ध्यान केंद्र उभारण्यात आलं आहे.
6. शिर्डी साईप्रसादलयात भक्तांसाठी महाशिवरात्रीनिमित्त साडे पाच टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद
महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि झिरकचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली आहे. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन दिवशी साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येत असतो. आज खिचडी सोबतच शेंगदाणा झिरकसुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला आहे. आज दिवसभरात जवळपास 50 ते 60 हजार भाविक साईप्रसादाला येतील अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा साडेपाच हजार किलोंचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे. आज साईबाबांच्या समाधीवर सुद्धा याच खिचडीचा प्रसाद दाखवण्यात येतो.
7. महाशिवरात्रीनिमित्त वाशीमच्या पद्मेश्वर संस्थेत महादेव पार्वती विवाह सोहळा पार पडणार
महाशिवरात्रीनिमित्त वाशीमच्या पद्मेश्वर संस्थेत महादेव पार्वती विवाह आज पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यापूर्वी काल रात्री हळद सोहळा पार पडला. याच निमित्ताने वाशीम शहरात मोठ्या संखेने स्त्री पुरुषांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. पद्मेश्वर संस्थेत आकर्षक मंडप सजावट करण्यात आली. तर यामध्ये एखाद्या माणसाप्रमाणे यामध्ये सोहळ्यात सहभागी लोकांनी एकमेकांना हळद लावत डफाच्या वाद्यावर चांगलाच ठेका धरला होता. तर आज लग्न सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी वरात आणि रात्री लग्न सोहळा पार पडणार आहे.
8. गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी जेजुरीत भाविकांची गर्दी
उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या गडावर महाशिवरात्री साजरी करण्यात आली. मंदिरात असणारी तीन गुप्तलिंग वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले केले जातात. सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. खंडेरायाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आणि शिखरामध्ये गुप्तलिंग आहे. गुप्तलिंग वर्षात फक्त एकच दिवस उघडले जाते. भूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक अशा तिन्ही लोकांचं एकाच दिवशी महाशिवरात्रीला दर्शन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला गडावर लाखो भाविक गुप्तलिंगाच्या आणि खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली.
9. महाशिवरात्रीनिमित्त नाशिकचे त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर 41 तास दर्शनासाठी खुले
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर समितीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जोतिर्लिंग ट्रस्टने सलग 41 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तसेच भाविकांसाठी दोन दिवस महाशिवरात्रीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.
10. विदर्भाची काशी गडचिरोलीच्या मार्कंडेश्वर मंदिरात 'हर हर महादेव'चा गजर
गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील पुरातन हेमाडपंती मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त 'हर हर महादेव'चा गजर ऐकायला मिळाला. 15 दिवस भरणारी ही यात्रा कोरोनामुळे गेली 3 वर्ष भरली नाही. यावर्षी यात्रेला परवानगी मिळाली. 'हर हर महादेव'चा गजर करीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आज दिसून आली. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे प्रसिद्ध पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. विशेष म्हणजे, वैनगंगा नदी तीरावर हे मंदिर वसलेले असून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदी मार्कंडेश्वर मंदिरापासून उत्तरवाहिनी झाली आहे. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त जवळपास पंधरा दिवस येथे मोठी यात्रा भरत असते.