Aurnagabad News: औरंगाबाद शहर सद्या राजकीय नेत्यांच्या सभा आणि मोर्च्यांमुळे चर्चेत आले आहे. त्यातच आता याच औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला ते काय उत्तर देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले. तर दुसरीकडे 8 जून रोजी होणाऱ्या  या सभेसाठी शिवसेनेकडून मराठवाडा पातळीवर तयारी सुरु आहे. 


मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनाचे औचित्यसाधून शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंची सभा ज्या मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर झाली तिथेच उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यासाठी औरंगाबाद शहरातील शिवसेना नेत्यांसह मराठवाड्यातील महत्वाचे नेते सभेच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरेंच्या सभेच्या गर्दीची चर्चा झाली होती, त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या सभेला सुद्धा गर्दी जमवण्याचा प्रयत्न शिवसेनकडून करण्यात येत आहे. 


बैठकांवर बैठका सुरु... 


उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या दृष्टीने शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून बैठकांवर बैठका सुरु आहे. तर सभेचं मैदान, येणाऱ्या कार्यकर्त्यांची व्यवस्था, पार्किंग, मुंबईतील येणाऱ्या महत्वाच्या नेत्यांची व्यवस्था, यासह इतर गोष्टींचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे. तर शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांच्यावर या सभेची विशेष जवाबदारी देण्यात आली आहे. 


राज -फडणवीसांना काय उत्तर देणार... 


उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्यात. भोंग्यांच्या मुद्यावरून राज यांनी मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हला चढवला होता. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी सुद्धा औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे ह्या दोन्ही नेत्यांना उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.