Maharshtra 10 Project approval : टाटा एअरबस आणि वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी यासाठी शिंदे आणि फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. तर शिंदे सरकारनं महाविकास आघाडीच्या चुकांमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरेंनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. यावरुन उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी मागील तीन महिन्यात आम्ही दहा प्रकल्पाला मान्यता दिल्याचं सांगितलं. यावेळी सामंत यांनी पत्रकार परिषदेत थेट दहा प्रकल्पाची माहिती दिली. त्या प्रकल्पाची यादीच त्यांनी जाहीर केली आहे. 


तीन महिन्यात  25368 कोटी रुपयांच्या दहा प्रकल्पांना मान्यता दिल्याचं सामंत यांनी सांगितलं. या दहा प्रकल्पामुळे 7430 जणांना रोजगार उपलब्ध मिळणार आहे. या दहा प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचं यावेळी सामंत यांनी सांगितलं. 


कोणत्या दहा प्रकल्पांना मान्यता दिली?


1)  मे. सिनारामस पल्प अॅण्ड पेपर प्रा. लि. (एशिया पेपर अॅण्ड पल्प) हा प्रकल्प रायगडमधील धेरंड येथे होणार आहे. यामध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात होणार आहे. यामधून तीन हजार जणांना रोजराग उपलब्ध होणार आहे. 


2) मे. सोलार इंडस्ट्रीज इंडिया लि. हा प्रकल्प नागपूरमधील काटोल तालुक्यात होणार आहे. 378 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे 840 जणांना रोजगार मिळणार आहे.


3) मे. महाराष्ट्र सिमलेस लि. हा प्रोजेक्ट रायगडमधील विलेभागड येथे होणार असून यामध्ये 375 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामुळे 200 जणांना रोजगार मिळणार आहे. 


4) मे. सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. हा प्रोजेक्ट अहमदनगरमधील रांजणखोल येथे होणार आहे. यामध्ये 662 कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून 142 जणांना रोजगार मिळणार आहे. 


5) मे. वरण बेवरेजेस लि हा प्रकल्प अहमदनगरमधील सुपा येथे दोन फेजमध्ये होणार आहे. या प्रकल्पामध्ये 779.34 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये 450 जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 


6) मे. विठ्ठल कॉप्रोरेशन प्रा. लि. सालापुरातील माढा तालुक्यातील म्हैसगावमध्ये हा प्रक्लप असेल. या प्रकल्पातून 548 जणांना नोकरी मिळणार आहे. 126.30 कोटींचा हा प्रकल्प आहे. 


7) मे. आयएफबी रेफ्रिजरेटर्स लि हा प्रकल्प पुण्यातील रांजणगावात होणार आहे. 750 जणांना नोकरी मिळेल. हा प्रकल्प 400 कोटींचा आहे. 


8) मे. जेनक्रेस्ट बायो प्रोडक्टस प्रा लि. हा प्रकल्प जळगावमधील खडका येथे होणार आहे. यामध्ये 650 कोटींची गुंतवणूक आहे. 625 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 


9) मे. मेगा प्राईप्स प्रा. लिं. हा 758 कोटींचा प्रोजेक्ट रायगमधील हेडवली येथे होणार आहे. या प्रकल्पामुळे 375 जणांना रोजगार मिळेल. 


10) मे. ग्रासिम इंडस्ट्रिज लिं. हा प्रकल्प रायगडमधील महाड येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 500 जणांना रोजगार मिळणार आहे. तर 1040 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.