मुंबई : मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचले आहे. धुळ्यात थंडीने 27 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे.


धुळ्याचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस आहे. तर परभणी, निफाडमध्ये तापमान 3 अंश सेल्सिअस आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे.

धुळे रेकॉर्ड ब्रेक थंडी

धुळ्यात थंडीने २७ वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे. धुळ्याचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस आहे. यापूर्वी 3 जानेवारी 1991 या दिवशी 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे.

गेल्या दोन दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवनावर या थंडीचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील रस्ते सायंकाळी सात नंतर तर शहरी भागातील रस्ते रात्री साडे आठ नंतर निर्मनुष्य होत आहे. गहू, हरबरा या पिकाला ही थंडी लाभदायी असली तरी कांदा पिकावर या थंडीचा परिणाम होऊ शकतो असं शेतकरी सांगत आहेत.

परभणील तापमान घसरले

राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्याखाली पोहोचले आहे. परभणीतील तापमान 3 अंशापर्यंत घसरले आहे.  मागच्या 10 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद परभणीत झाली आहे. तर हे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे.

निफाड

निफाड तालुक्याचा पश्चिम बागायती पट्टा असलेल्या कसबे सुकेणे परिसराचा थंडीचा पारा आज पहाटे घसरला. तीन वर्षानंतर पुन्हा कडाक्याची थंडी पडली असुन निफाड येथे गहु संशोधन केंद्रात 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतातील पुदिना पिकांवरील दवबिंदू सलग दुस-या दिवशी गोठले.

कसबे सुकेणे व परीसरात थंडीचा जोर वाढला. आज शुक्रवार पहाटे कडाक्याची थंडी पडल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव,कोकणगाव ,साकोरे मिग ही गावे गारठली.

नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक थंड

नागपूरच्या इतिहासात आज सर्वाधिक थंड दिवस आहे. नागपूरचं आजचं तापमान 3.5 अंश सेल्सिअस आहे. यापूर्वी नागपुरात 7 जानेवारी 1937 ला 3.7 अंशांची नोंद झाली होती. त्यानंतर 29 डिसेंबर 2014ला 5 अंशांची नोंद झाली. त्यामुळे नागपूरच्या इतिहासात 29 डिसेंबर 2018ची नोंद सर्वाधिक थंड दिवस म्हणून झाली आहे.

विशेष म्हणजे  26 डिसेंबर 2018 रोजी नागपूरात किमान तापमान 10.9 अंश सेल्सियस होते. फक्त 2 दिवसात पारा 10.9 वरून 3.5 वर आला आहे. म्हणजेच 2 दिवसात पारा सुमारे 70 टक्के खाली घसरला आहे.

पुण्यात १० वर्षातील नीचांकी तापमान

पुणे किमान तापमान 5.9 अंश सेल्सिअस आहे. गेल्या 10 वर्षातील पुण्यातील हे नीचांकी तापमान आहे. सकाळी साडे आठ वाजता या तापमानाची नोंद झालेलं हे तापमान आहे.

पुण्यातील पाषाण-सुस रोड भाग आज सर्वाधिक थंड असून तिथे 5.4 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 27 डिसेंबर 1968ला सर्वाधिक नीचांकी 3.3 अंश झाले होते.

अकोला थंडीनं गारठलं

राज्य गेल्या दोन दिवसांत थंडीनं चांगलंच गारठलंय. अकोल्यातही आज गेल्या पाच वर्षांतील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्याचे आजचे तापमान 5.9 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

कालही अकोल्याचं तापमान 8.6 अंश सेल्सिअस होतं. या थंडीमूळे शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटलेल्या पहायला मिळत आहेत.

जालन्याचा पारा 9 अंशावर

मराठवाड्यात थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. आज जालना येथे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जालन्यात आजच तापमान 9.1 नोंदवल गेलंय. जे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी तापमान आहे.

गेल्या काही दिवसापासून तापमानात सातत्याने घसरण सुरूच असून आजच्या सर्वाधिक कमी तापमानाने जालना शहरातील रस्त्यावर धुके पसरलेले पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसापासून अनेक रस्ते सकाळी 9 वाजेपर्यंत निर्मनुष्य असतात. सर्वाधिक रहदारी असलेल्या जालना औरंगबाद रोडवर किमान सकाळी साडेसात पर्यंत तरी लाईट लावून प्रवास करावा लागला.

सातारा-महाबळेश्वरात बर्फाची चादर

महाराष्ट्राची शान असलेल्या महाबळेश्वरात सर्वत्र बर्फाची चादर पहायला मिळाली. महाबळेश्वरातील तापमान आणखी घसरले तर वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठले.

नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना निसर्गाकडून जणू एक प्रकारे गिफ्टच मिळाले आहे. याच महाबळेश्वरात आज बर्फाची चादर पहायला मिळाली. वेली, फुल, झाड, झुडप आणि महाबळेश्वरची शान असलेली स्ट्रॉबेरी या सर्वांवर बर्फाची चादर पहायला मिळाली.

राज्यभरातील तापमाची नोंद

निफाड़ - 3.0

पुणे- 5.9

धुळे- 2.2

नाशिक- 5.1

पुणे- 5.9

नागपूर- 3.5

परभणी- 3

वर्धा- 8.4

सांगली 14

अकोला- 5.9

वाशिम- 9

जालना- 9

अमरावती- 6.3

चंद्रपूर- 9

जळगाव- 6