मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण सध्या इतक्या घडामोडींनी भरलं आहे. त्यात नेत्यांच्या विधानानी त्याला आंतरराष्ट्रीय फोडणी मिळताना दिसतेय. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जो बायडेन (Joe Biden) यांचं नाव घेऊन एक वक्तव्य केलं आणि त्यावरुन त्यांची खिल्ली सुरु झाली. पण संजय राऊत यांनी हे विधान कुठल्या उद्देशाानं केलं होतं, त्यामागची कहाणी काय आहे.
महाराष्ट्राच्या बंडाची सातासमुद्रापार चर्चा झाली, जगभरातल्या वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. अगदी बंडानंतर लगेच पाकिस्तानमध्ये एकनाथ शिंदे हे नाव ट्रेंडिंगमधे असल्याच्याही बातम्या होत्या. पण यावेळी तर थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आपल्याबद्दल विचारणा केल्याचं मुख्यमंत्री स्वत:च म्हणाले..त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावरुन मुख्यमंत्र्यांवर जोरदार टोलेबाजी केली. पण मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य आणि त्यावर खासदार संजय राऊत यांचं प्रत्युत्तर यावरच ही कहाणी संपत नाही.
खासदार संजय राऊत यांनी जे विधान केलं ते उपहासानं आहे हे न समजता सोशल मीडियावर त्यांची खिल्ली सुरु झाली. संजय राऊत यांच्याबाबत असा गैरसमज व्हायला कदाचित याआधीच्या त्यांच्या वक्तव्यांचा इतिहासही कारणीभूत ठरला असावा.
शिवसेनेतलं बंड हे गल्ली पासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय आहे.पण आता त्यावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवरची करमणूकही सुरु आहे. त्यात नेत्यांच्या वक्तव्यातला उपहास समजून न घेता त्याला गांभीर्यानं घेण्यात काहीजण पुढे आहेत, तर दुसरीकडे गांभीर्यानं केलेल्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवयही आपल्याला जडल्यानं गोंधळ आणखी वाढताना दिसतोय. राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणल्याबद्दल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले होते. कौतुकाच्या ओघात त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला देखील तुम्ही सल्ला द्यायला हवा, असा सल्ला ठाकरेंना दिला होता. या नंतर संजय राऊतांवर टीका झाली होती