Farmer Police Complaint: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थकीत वीज बिलासाठी (Electricity Bill) वीज तोडू नये, अशा सूचना देऊनही माझी वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचे आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत हिंगोली जिल्ह्यातील (Electricity Bill) एका शेतकऱ्याने (Farmer) थेट पोलिसात तक्रार (Police Complaint) दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. सेनगाव तालुक्यातील माझोड येथील दशरथ गजानन मुळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मुळे यांनी गोरेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ज्या भागात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा भागात वीज पुरवठा खंडित करू नये व सक्तीची वीज बिल वसुली करू नये अशा सूचना आपण दिल्या असल्याचं 21 नोव्हेंबर 2022 रोजी माध्यमांना बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र तरीही वीज वितरण कंपनीने माझा वीज पुरवठा खंडित केला. माझीच नव्हे, इतर अनेकांची वीज कापली. असल्याचा आरोप करत मुळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
माझी फसवणूक,गुन्हा दाखल करा!
याच तक्रारीत मुळे यांनी म्हटले आहे की, मला अतिवृष्टीच्या मदतीची मिळालेली रक्कम बिलापोटी भरावी लागली. यासाठी महावितरणने दादागिरीची भूमिका घेतली होती. यातून उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर अन्यथा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे गोरेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मुळे यांनी म्हटले आहे.
फडणवीसांच्या आदेशाला महावितरणकडून केराची टोपली...
राज्यातील अनेक भागात आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. अशात शेतकरी रब्बीची लागवड करत असतानाच महावितरणकडून थकीत वीज बिलसाठी थेट वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान चालू महिन्याचे बिल भरलेल्या अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट न करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्यानंतर देखील राज्यातील अनेक भागात महावितरणकडून कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वीज बिल भरल्यावर देखील कनेक्शन कट करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे फडणवीसांच्या आदेशाला महावितरणकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.