Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांनी ट्वीट करत हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच कायदामंत्री किरेन रिजिजू (Minister Kiren Rijiju) यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. आजच हिराबेन मोदी यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत. हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






 


विविध स्तरातून हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. आईच्या मृत्यूने माणसाच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरून काढणे अशक्य असते. या दुःखाच्या प्रसंगी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती! असे ट्वीट करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माताश्री हिराबेन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अत्यंत खडतर आणि संघर्षमय जीवन जगताना हिराबेन यांनी आपल्या कुटुंबाला चांगले संस्कार दिले. त्याच संस्कारातून देशाला नरेंद्रभाईंसारखा नेता लाभली, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिराबेन यांनी श्रद्धांजली वाहिली.






 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिराबेन मोदींना वाहिली श्रद्धांजली 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. हिराबेन मोदी यांचे निधन ही अत्यंत दु:खद घटना आहे. हिराबेन या एक आदर्श आणि तपस्वी माता होत्या. त्यांनी आपल्या देशाला आदर्श सुपुत्र दिला, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण केली. हिराबेन मोदी यांनी प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडली. त्या त्यांचं संपूर्ण जीवन सामान्य जगल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 


हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद घटना : देवेंद्र फडणवीस


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. आई सोबत नसणं यासारखे दुसरे मोठे दु:ख नाही. याप्रंसंगी आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असे ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.   


त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला : विरोधी पक्षनेते अजित पवार 


माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही : संजय राऊत


आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही. आई जाण्याचे दुःख मोठे आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर आघात झाला आहे. ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या:


Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास