Transgender Wedding : बीडमधील तृतीयपंथीय सपना आणि ढोलकी वाजवणारा बाळू यांचा विवाह  सोहळा उद्या पार पडणार आहे. आज सपनाच्या घरी धार्मिक परंपरेनुसार हळदीचा सोहळा उत्साहात पार पडला. या हाळदीच्या सोहळ्यासाठी सपनाच्या घरासमोर मंडप उभारण्यात आला होता. याच मंडपात चौक भरला आणि या चौकावर सपना आणि बाळूला हळद लावण्यात आली.  


सपना आणि बाळूची  प्रेम कहाणी अवघ्या महाराष्ट्राने पहिली आहे. राज्यभरातून या प्रेमकहाणीचे कौतुक होत आहे. सपनाने तिच्या आयुष्यामध्ये कधीही तिला हळद लागेल असं स्वप्न बघितलं नव्हतं. परंतु, बाळूच्या साथीने तिला हळद लागली आणि उद्या ती बहोल्यावर चढणार आहे. उद्या सकाळी साडेअकरा वाजता बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर परिसरात सपना- बाळू विवाह बंधनात अडकणार आहेत.  
 
मनमाडच्या तृतीयपंथी शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांच्यासह त्यांचे पती संजय झाल्टे, शिवलक्ष्मी यांच्या सासू आणि किन्नर आखाडाचे महाराष्ट्र व्यवस्थापन प्रमुख श्रीमंत ऋषिकेश महाराज या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सपना आणि बाळूचे नातेवाईकही विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या लग्न सोहळ्यासाठी सपनाच्या घरी आता लगबग सुरू झाली आहे. पाहुणे मंडळी घरी येत आहेत.   


सपना-बाळूची अनोखी प्रेमकहाणी
बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी सुरू झाली. ही प्रेमकहाणी सत्यात उतरत उद्या सपना आणि बाळू आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या