मुंबई : पुढील तीन दिवसात कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणेसह कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज, 30 मे रोजी मराठवाड्यात आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील, असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
पुढील 36 तासांत हवामानात मोठा बदल
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघरला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट
हवामान विभागच्या अंदाजानुसार, पुढील 36 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघरला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, ठाणे आणि मुंबईमध्ये काही तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 29°C च्या आसपास असेल, असा अंदाज आहे.
मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची सरी
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याशिवाय, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर या भागातही पावसाची मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची सरी पाहायला मिळतील. दरम्यान, केरळमध्ये मान्सूनची चाहूल लागली असल्याने लवकरच देशात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मान्सूनची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :