मुंबई : मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) विरोध केला. त्याविरोधात बुधवारी महाडमधील चवदार तळं इथं आव्हाडांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली आणि हे आंदोलन आता आव्हाडांच्या अंगलट आल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाडांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला कागद फाडला गेला आणि त्यावरून आता राज्याचं राजकारण तापल्याचं दिसतंय. 


मनुस्मृतीच्या प्रती जाळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधलं ऐतिहासिक तळं गाठलं. मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश नको म्हणून त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. मात्र या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या हातून एक मोठी चूक घडली. त्यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला. आव्हाडांच्या हातून घडलेल्या या कृत्याविरोधात नाशिक, मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं. 


वंचितचा निषेध 


झाल्या प्रकाराबद्दल जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली खरं, पण यावरून सुरू झालेलं राजकारण आता थांबण्याचं नाव घेत नाही.  भाजपनं जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार टीका करत गुरूवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. तर वंचितनेही त्यावर प्रतिक्रिया दिली. 


आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृती संपेल. जर मनात मनुस्मृती आहे तर ती कृतीत उतरते आणि अशा गोष्टीं होतात. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीने आव्हाड यांच्याकडून झालेल्या कृतीवर भाष्य केलं आणि त्यांचा निषेध व्यक्त केला. 


माफी मागितली तरी प्रकरण तापलं


तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने आव्हाडांना अटक करावी अशी मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.


या सगळ्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी जरी माफी मागितली असली तरी विरोधकांच्या हाती हा आयता मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे हे राजकीय आंदोलन चांगलंच अंगलट आल्याचं दिसतंय. 


अस्पृश्यांना पाणी मिळावं म्हणून याच चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. आता त्याच चवदार तळ्यावर बुधवारी झालेलं राजकीय आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान अनावधानानं का होईना, पण बाबासाहेबांच्या फोटोचा झालेला अपमान आणि त्यानंतर सुरू झालेलं राजकारण... आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर त्यांना काय वाटलं असतं? असा प्रश्न आता सामान्यजणांना पडला आहे.


ही बातमी वाचा :