Weather update: राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान तापमानाचा पारा लक्षणीय घटल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र चांगलाच गारठलाय. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसह मराठवाड्यातही तापमान घसरले आहे.
सोमवारी निफाड येथे 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 5.8 अंश सेल्सिअस, परभणीत 6.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (23 डिसेंबर) अहिल्यानगर 7.4 अंशावर आहे. मालेगाव 8.4 नाशिक 9.2, तर बीड 9.6° गेले आहे.
Maharashtra Weather Update: हवामान विभागाचा अंदाज काय?
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा तापमान घटनेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील तीन दिवसात दोन ते तीन अंशांनी किमान तापमानात घट होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 23 ते 25 डिसेंबरदरम्यान, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान जवळपास 7 ते 9 अंशांपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. उर्वरित भागात येत्या 24 तासात किमान तापमानात फारसा बदल राहणार नसून त्यानंतर तापमान दोन ते तीन अंशाने घटणार आहे.
पुणेकरांना हुडहुडी, किमान तापमान घटले
उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने यंदा मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पुण्यातही मध्यवर्ती शहरासह उपनगरांमध्ये वारंवार तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात येते आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात थंडीची लाट होती. अजूनही पुण्यात चांगलाच गारठा जाणवतोय. आज बहुतांश पुण्यात तापमानाचा पारा 7 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. हवेली 7.5°, शिवाजीनगर पाषाण बारामती दौंड या भागात 8- 8.5अंश सेल्सिअस, आंबेगाव तळेगाव 10 ते 11 अंशावर, हडपसर 11.2 अंश, कोरेगाव पार्क 13, मगरपट्टा 15.6 तर चिंचवड 14.5°c वर होतं.
विदर्भ मराठवाड्यात किमान तापमान कसे?
विदर्भ मराठवाड्यातही किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भात नागपूर गोंदिया 9 अंशावर असून भंडारा गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा 10 अंशावर होता. अमरावती, वाशिम, जिल्ह्यात 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, चंद्रपूर 12 अशांवर होते. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यात 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड 10.5, धाराशिव 11.1, उदगीर 12.4, बीड 9.6 अंशांवर होते.