Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उष्णतेचा पाऱ्याने (Temperature) उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची (Monsoon Has Arrived In India) चाहूल लागली असताना दुसरीकडे अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.


नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी  मान्सून पूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ उडावली आहे. तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला आहे. 


लातूरला पावसाची जोरदार बॅटिंग


लातूर शहर आणि परिसरात पावसानं आज तुफान बॅटिंग केलीय. विजेच्या कडकडाटासह  पाऊसने जोरदार हजेरी लावली. यात औसा रोड, आंबेजोगाई रोड, बार्शी रोड, नांदेड रोड या भागातील मुख्य रस्त्यावरून अक्षरक्ष: पाणी वाहत होतं. ढगाच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसाने कडक उन्हाळ्यानंतर पावसाचा फील दिला. आज दिवसभर उकाडा जाणवत होता. तर पावसाने मागील एक आठवड्यापासून जोरदार हजेरी लावल्याने पावसाळ्याच्या तोंडावरच पावसाळ्याचा फील मिळायला सुरुवात झाली आहे. लातूर शहर आणि परिसरात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जातोय. 


कोकणातही पावसाची दमदार एंट्री


महाराष्ट्रातील कोकणातही पावसाने हजेरी लावली आहे. चिपळूण मध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. कडाक्याच्या उष्णतेनंतर जिल्ह्यातील अनेक भागात वरुण राजाची दमदार एंट्री झाल्याचे बघायला मिळाले. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी वर्गातही आनंद आहे. तर उष्णतेमुळे हैराण नागरिक सुखावला आहे. पहिल्याच पावसात महामार्गावर पाणीच पाणी. तर गटारांच्या अर्धवट कामांमुळे चिपळूण शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र होते. मान्सूनच्या आगमनामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामांनाही आता  वेग येणार असल्याने बळीराजाची लगबग सुरू झाली आहे.  


 विदर्भात पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा इशारा


आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर  आज पासून पुढील 5 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आगामी काळात विदर्भात सर्वत्र तुरळक ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.


इतर महत्वाच्या बातम्या