Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.
मुंबईतील कमाल तापमानात आज मोठी घट नोंदवली गेली आहे. रविवारी सांताक्रुज वेधशाळेत कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय तर कुलाब्यात कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस होतं. शनिवारी कमाल तापमान हे 29.7 अंश सेल्सिअस होतं. मुंबईत मागील 10 वर्षातील सर्वात कमी कमाल तापमान नोंदवलं गेलंय. आज सकाळपासूनच धुक्याचं चित्र मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बघायला मिळालं होतं. सोबतच दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं कमाल तापमानात घट झाली आहे.
पश्चिमी चक्रवातामुळे पुढील 3 ते 4 दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. सोबतच मराठवाड्यात देखील कमाल तापमानात घट झाली आहे. औरंगाबादमध्ये आज कमाल तापमान 23.3 अंश सेल्सिअस बघायला मिळालं. तिकडे, महाबळेश्वरमध्ये रात्री पाऊस झाल्याने सर्वत्र धुक्याचे चित्र बघायला मिळालं. अशातच महाबळेश्वरमध्ये देखील कमाल तापमानात घसरलं आहे. महाबळेश्वरमध्ये कमाल तापमान 18.5 अंश सेल्सिअस होतं. दुसरीकडे, येणाऱ्या 2 ते 3 दिवस राज्यात किमान तापमान देखील कमी होणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी, थंडीत वाढ
महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.