Maharashtra weather update: गेल्या चार दिवसांपासून तुफान हजेरी लावणाऱ्या पावसाचा जोर आज काहीसा ओसरलाय . पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची विश्रांती असेल असे हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे . महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या बेफाम पावसामुळे मुंबई- पुण्यासह मराठवाडा व विदर्भात चांगलीच दाणादाण उडाली.  पावसाच्या घटनांमध्ये आत्तापर्यंत राज्यभरात मृत्यूचा आकडा 24 वर पोहोचला आहे .  शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय .मोठी पडझड व शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे .राज्यभरातील धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे  अनेक धरणे फुल्ल झाली आहेत . अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय . नद्या ओसंडून वाहत असून अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय .हजारो नागरिकांचे स्थलांतर झाले आहे .

Continues below advertisement


प्रादेशिक हवामान केंद्रच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण भागात कमाल तापमानात पुढील 24 तास  कोणताही बदल राहणार नाही मात्र त्यानंतर दोन ते चार अंशांनी तापमान वाढेल .


हवामान विभागाचा अंदाज काय ?


बंगालच्या उपसागरात असणारा कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे सरकत आहे .तसेच अरबी समुद्रावर असणारे चक्राकार वारेही गुजरातच्या दिशेने वाहत असल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर ओसरणार आहे . आज पासून पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता आहे .23 ऑगस्टपर्यंत मुंबई, कोकण ,मध्य महाराष्ट्र भागात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे . 25 ऑगस्ट नंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्र सह गुजरातमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो .


पुढील पाच दिवस कुठे कसे हवामान ?


पुढील पाच दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे .कोकणात पुढील चार दिवस पावसाचे इशारे आहेत .पुणे सातारा घाट माथ्यावरही हाय अलर्ट देण्यात आले असून दोन दिवसांनी विदर्भात पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . 




21 ऑगस्ट :  पुणे व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट , रत्नागिरी रायगड ठाणे पालघर व नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट . उर्वरित ठिकाणी पावसाची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय .
22 ऑगस्ट : रायगड रत्नागिरीसह पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट, उर्वरित ठिकाणी अलर्ट नाही
23 ऑगस्ट : रायगड रत्नागिरी व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट, विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया व गडचिरोलीलाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय .
24 ऑगस्ट : रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट असून अमरावती यवतमाळ वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आलाय .
25 ऑगस्ट : सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट . पुणेसातारा घाटमाथ्यावर तुफान पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे .