Weather Update:गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे . राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजून तीन ते चार दिवस पावसाचा सावट कायम आहे . गेल्या 15 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात जोरदार पाऊस होतोय . मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीसह मराठवाडा विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे . हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते चार दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे . काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहेत .(IMD Forecast)
काल रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली होती पण आज सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे .आणखी दोन दिवस कोकणात पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय . या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाला आहे .कोकणातील भात पिकाचे नुकसान झाले असून आंबा विशेषतः हापूस आणि मच्छीमारांवरही परिणाम झाला आहे .
हवामान विभागाचा नेमका अंदाज काय ?
आधी परतीचा पाऊस, नंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ यामुळे महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाने झोडपले आहे . हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे .तसेच चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकत असल्याने पुढील 24 तासात पश्चिमी चक्रावात (Western disturbance) जाणवेल .याचा परिणाम विदर्भ आणि त्याला जोडून मराठवाड्यावर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे .
पुढील 4 दिवस हवामान कसे?
आज (3 नोव्हेंबर ) बीड धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय .तर उर्वरित मराठवाड्यातील व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असला तरी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व तळ कोकणात बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे .दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे .
बुधवारपासून (5 नोव्हेंबर ) दक्षिण मध्य महाराष्ट्रात व कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे .सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय .तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
गुरुवारी ( 6 नोव्हेंबर ) कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे .रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .