Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर अनेक मागण्यांना घेऊन प्रहारचे सर्वेसर्वा आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांच्या नेतृत्वात उपराजधानी नागपुरात (Nagpur) अभूतपूर्व असे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर कर्जमाफी आणि इतर मागण्यासंदर्भात 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपुरतील आंदोलनाला (Bacchu Kadu Farmer Protest) आता काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रचंड चिडचिड करत होते, या बैठकीत मोठी खडाजंगी झाली, असे अनके खुलासे शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी उघड केले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी या बैठकीतील इनसाईड स्टोरी सांगितलीय.
Ravikant Tupkar : नेमकं काय म्हणाले रविकांत तुपकर
सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीत मुख्यमंत्री चिडचिड करत होते, या बैठकीत मोठी खडाजंगी झाली. सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या आणि 30 जूनच्या निर्णयावर मी समाधानी नाही. असं मत शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. या आंदोलनात सर्व शेतकरी नेत्यांची कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकजुटता दिसली आणि आगामी काळात ती टिकून राहील. असेही ते म्हणाले.
Ravikant Tupkar : मंत्र्यांना कापा या वक्तव्याचा मला अजिबात पश्चाताप नाही
आगामी काळात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण राज्यात एक मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. ज्यामुळे सरकारच्या बुडाला आग लागेल. 'मंत्र्यांना कापा' या माझ्या वक्तव्याचा सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीत विषय निघाला त्यावेळेस सरकारमधील लोक मला म्हणायचे, तुम्ही जर मंत्री झाले तर तुम्ही कुणाला कापाल? आमदार मंत्र्यांना कापा या वक्तव्याचा मला अजिबात पश्चाताप नाही, मी अजूनही या वक्तव्यावर ठाम आहे. जर सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, तर नक्कीच आगामी काळात तसं घडू शकतं. असेही रविकांत तुपकर म्हणाले.
Ravikant Tupkar on Election Commission : मीही लोकसभा निवडणुकीत थोड्याच फरकाने पडलो, पण...
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे बोगस मतदारांच्या मुद्यावरुन निवडणूक आयोगावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट निवडणूक आयोगाची लाजच काढली. निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे. आमच्याकडे 20 आणि 22 टक्के मतदान होतं, असे म्हणत आमदार संजय गायकवाड हे निवडणूक आयोगावर संतापल्याचं पाहायला मिळालं.
मत चोरीचा मुद्दा खरा आहे. मीही लोकसभा निवडणुकीत थोड्याच फरकाने पडलो. मात्र त्यावेळेसच मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की सायंकाळी इतकं मतदान कसं वाढलं? असेही ते म्हणाले.