मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील दोन- तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहेत. तसेच, शहरात येत्या दोन दिवसांत शहरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवली आहे. 


हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्वीट करत पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होण्याची माहिती दिली आहे. पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये व आणखी काही भागांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. 






लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आण तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. पण, पुण्यात दिवसभर पाऊस पडला नाही. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि उन्हाचा खेळ सुरू होता. दुपारनंतर उकाडा वाढला. सायंकाळी मात्र मात्र शहराच्या विविध भागांत पावसाच्या सरींचा हलका शिडकावा झाला. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार असण्याची शक्यता आहे. 


 यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये वर्दी दिल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. 11 जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये सामन्यत: 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु यंदा दोन दिवस उशिरा वरुणराजाने हजेरी लावली.