रायगड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना काळात मोर्चे न काढण्याचं आवाहन केलं आहे. ते रायगड श्रीवर्धन (Raigad) दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 6 जून रोजी शिवराज्याभिषेक घरीच राहून करा, किल्ले रायगडावर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या काळात मोर्चे काढू नये, लोकांच्या जीवाशी न खेळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करा. तिसऱ्या लाटेसंदर्भात काय उपाययोजना करणार यासाठी बैठक घेण्यात आली आहे. निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही ते म्हणाले. राज्याला केंद्राने मदत करावी, असं देखील ते म्हणाले.
वादळग्रस्तांना साडेतीन पट अधिक निधी दिला जाईल. समुद्रकिनारी होणाऱ्या नुकसान कमी करण्यासाठी उपाय करण्याचे निर्देश वास्तुविशारद यांना दिले आहेत. झेडपीच्या शाळा वादळरोधक , शाळा काँक्रीटच्या बनवण्याचे निर्देश देण्यात आलं असल्याचं अजित पवार म्हणाले.
Corona Delta Variant : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला 'डेल्टा व्हेरिएंट' नेमका काय आहे?
मराठा आरक्षण संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने जे वकील दिले होते तेच आम्ही सुद्धा दिले आहेत.कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले जाणार असल्याचं ते म्हणाले. कालच्या अनलॉकसंदर्भातील झालेल्या गोंधळाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सरकारमध्ये सुसंवाद आहे, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य आहे.
रायगड जिल्ह्यात नऊ अर्बन हेल्थ सेंटरची उभारणी करणार - राजेश टोपे
रायगड जिल्ह्यात नऊ अर्बन हेल्थ सेंटरची उभारणी करणार असल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले. महाड येथील ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय करणार असून माणगावमध्ये ट्रामा केअर तयार करणार असल्याचं टोपे म्हणाले. म्युकरमायकोसिस उपचारासंदर्भात खाजगी रुग्णालयातील खर्च हा कमाल पाच लाखापर्यंत मर्यादित करण्याचे निर्देश दिले असल्याचं ते म्हणाले. कोकणातून आखाती देशात कामाला जाणाऱ्या रहिवाशांचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.