मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढला आहे. मागील 12 तासांपासून पावसाचा जोर (Heavy rain) वाढल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी म्हणजे 19 जून ते 22 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांचा परिणाम आणि सक्रिय मान्सूनमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 19 जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही काही भागांत जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
पुण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात
पुण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू झाली आहे. सकाळच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आज दिवसभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर घाट माथ्यावर ही मुसळधार पाऊस सुरु आहे. पर्यटननगरी लोणवळ्यात ही तुफान पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 221 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत 323 मिलिमीटर पाऊस झाला होता. तर यंदा मात्र पावसाने इतकी जोमाने बॅटिंग केलीये की त्यामुळं आजच्या दिवसापर्यंत 1166 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी
मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट अपग्रेड करत मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत आज
70 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
घाटमाथ्यावर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये 19 जून रोजी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. 20 ते 22 जून दरम्यान या भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. लातूरमध्ये 20 जूनला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः नदीकिनारी व डोंगराळ भागात रहिवासी व पर्यटकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनांना रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा जवळील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे. तर दुसरीकडे आज वादळी वाऱ्यासहित पाऊस लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग रोहा तळा महाड पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.