Maharashtra Weather Update: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा थंडीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. उत्तर दिशेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव राज्यावर स्पष्टपणे जाणवतोय. त्यामुळे किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे अनेक भागात पहाटे धुके पडल्याचे चित्र दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रात्रीचे तापमान लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. यामुळे थंडीचा जोर अधिक वाढला आहे. पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांमध्ये पहाटे आणि रात्री थंडी अधिक जाणवणार आहे. विशेषतः मध्य भाग आणि मराठवाड्यात गारठा टिकून राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शुक्रवारी, पुण्यात ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक 9.1 सातारा 10 नगर 7.5, नांदेड 9.8, छत्रपती संभाजीनगर 10.7 अशांवर होते.
कोकणात हवामान कसे?
या किनारपट्टीच्या भागात हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. मुंबई शहरात दिवसाचं तापमान सुमारे 32 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून रात्रीचं तापमान सुमारे 18 अंशांपर्यंत खाली येऊ शकतं. संपूर्ण दिवसभर पावसाची शक्यता नाही त्यामुळे हवा कोरडी राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात कसे राहणार हवामान?
पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात थंडीचा कडाका वाढणार असून पहाटे गार हवा जाणवेल. पुणे परिसरात सकाळच्या वेळेत धुकं दिसण्याची शक्यता आहे. दिवसा उष्णता फारशी जाणवणार नाही. कमाल तापमान सुमारे 30 अंशांपर्यंत राहू शकतं, तर रात्री तापमान जवळपास 10 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा विदर्भात काय स्थिती?
या भागात सकाळच्या वेळी थंडीचा जोर जाणवेल.काही ठिकाणी आकाश हलकं ढगाळ दिसू शकतं. छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात फारसा बदल होणार नाही.
विदर्भात गारठा कायम राहणार आहे. सकाळच्या वेळेत थंडी अधिक राहण्याची चिन्हं आहेत. दिवसभर अंगात हुडहुडी भरणारी थंडी राहू शकते. काही ठिकाणी रात्रीचं तापमान 10 अंशांच्या आसपास पोहोचल्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे.