Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी तापमान खालावलंय.उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि गारठ्यानं नागरिक कुडकुडले आहेत. राज्यात सध्या सर्वाधिक निचांकी तापमानाची (lowest Temperature) नोंद धुळ्यात करण्यात आली. धुळ्याचं तापमान 4.3 अंशांवर पोहोचलं होतं. परभणी, निफाड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडे थंडीची लाट कायम असून राज्यातील किमान तापमानात बदल दिसणार असल्याचं हवामान विभागानं (IMD) सांगितलंय. राज्यात शुक्रवारी बहुतांश ठिकाणी किमान तापमान वाढलं होतं. 


उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्रात कायम येत असल्याने बहुताश ठिकाणी थंडीचा कडाका कायम राहणार आहे. परंतू बहुतांश ठिकाणी किमान तापमानात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी तापमानात काहीशी वाढ झाल्याचे चित्र होते, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कडाका कायम होता. बहुतांश ठिकाणी 10 अंशांच्या खाली तापमान गेलं होतं. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत थंडीचा कडाका काहीसा कमी होणार असून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमानात प्रचंड घसरण झाली होती.


जनावरंही कुडकुडली, कोरड्या वाऱ्यांचा झोत वाढला


सध्या राज्यात थंडीची लाट (Cold Wave) अनुभवायला मिळत असून मागील दहा दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वातावरणामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे. थंडीपासून बचाव होण्यासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहे. परंतु, दुसरीकडे पाळीव जनावरांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी पशुपालक देखील विविध उपाय योजना करताना पाहायला मिळतंय. आता थंडी कायम राहणार असून किमान तापमान काहीसे वाढणार असल्याचं IMD नं सांगितलंय.पुढील काही दिवस पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील कोरड्या वाऱ्यांचा झोत अधिकाधिक वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं झेपावत राहिल्यास राज्यावर हाडं गोठवणाऱ्या थंडीची पकड आणखी मजबूत होणार आहे, उत्तर महाराष्ट्र यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असेल. तर, राज्याच्या उर्वरित भागात मात्र थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. 


हेही वाचा:


Ahilyanagar News : कडाक्याच्या थंडीने गुरं कुडकुडायला लागली, अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने गोठ्यात हॅलोजन लावले; पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सल्ला