मुंबई : राज्यात (Maharashtra Weather) कुठे ऊन (Heatwave), तर कुठे पाऊस (Rain) असं चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भात (Vidarbh) उष्णतेच्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. तर काही भागात अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. असं असलं तरी विदर्भात मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भात उष्माघाताने तीन बळी घेतले आहेत. उष्माघाताने (Heat Stroke) यवतमाळमध्ये दोघांचा तर बुलढाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे.


नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू


यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्याचा पारा 46 अंशावर गेला आहे. अशातच नऊ महिन्याच्या चिमुकलीसह एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. बेलोरा येथील विद्या निलेश टेकाम असं मृत चिमुकल्या मुलीचं नाव आहे तर, चिचमंडळ येथील दादाजी मारुती भुते असे 70 वर्षीय मयत वृद्धाचं नाव आहे. 


सध्या 40 उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार सुरू


उष्माघातामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मृत्यूचं नेमके कारण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सांगता येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दूरध्वनी वर संपर्क केला असता दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात सध्या 40 उष्मघाताच्या रुग्णांवर उपचार सुरू असून तहसील रुग्णालयात 14 आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात 66 असे एकूण 84 शीत कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.


शेतात काम करणाऱ्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू


बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. संग्रामपूर येथे उष्माघाताने शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सचिन वामनराव पेठारे असं उष्माघाताने मृत्यू पावलेल्या 40 वर्षीय मजुराचं नाव आहे. सचिन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असून तो शेत मजूर म्हणून काम करत होता. सचिन वामनराव पेठारे याची तामगाव पोलिसांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.