Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
'या' भागात जोरदार पावसाची शक्यता
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.
मुंबईतील काही भागात अतिवृष्टी होणार
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 14 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून 14 जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे.
राज्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्याची दाट शक्यता
सध्या पडणारा पाऊस हा भाग बदलत पडणार पाऊस आहे. या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्याची दाट शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. म्हणजेच जून महिन्यातच अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.
अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस
सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वीच राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. भाजीपाला पिकांसह फळबागांचं अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्वाच्या बातम्या: