Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात हवामान (Weather) नेमकं कसं असेल? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. 20 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर कायम राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबदारी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. राज्यातील कोकण विभागात 17 ते 20 एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज डखांनी वर्तवला आहे.
शेतकऱ्यांनी सावध राहावे
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागात देखील आज आणि उद्या अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळं सदर भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे डख म्हणाले. दरम्यान, राज्यातील काही भागात दिवसा तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी ऊन असताना घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात येत आहे.
यंदा पडणार दमदार पाऊस
दरम्यान, भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर झाला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबतची माहिती दिलीय. यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असं भाकीत IMD ने वर्तवलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही देखील दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.
महत्वाच्या बातम्या: