मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातली महापुराचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात येणाऱ्या भाजीपाला आणि दुधावर झाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये भाजीपालाची आवक 200 गाड्यांनी घटली आहे. तर पुरामुळे दुधाचं संकलन थांबल्याने आणि महामार्गावर पाणी साचल्याने शहरातील दुधाचा पुरवठा घटला आहे.

भाजीपाल्याची आवक घटली
पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई, मुंबई, ठाण्यात भाजीपाल्याचा पुरवठा होतो. परंतु सांगली, कोल्हापूर, कर्नाटकमधील पुराचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. त्यामुळे कर्नाटक तसंच पश्चिम महाराष्ट्रातून कालपासून अतिशय कमी प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली आहे. तसंच पावसामुळे भाजीपापाल पोहोचायला उशीर झाल्याने निम्मा भाजीपाला गाडीतच खराब झाला आहे. परिणामी भाजपाल्याच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

एपीएमसीमधील भाजीपाला दर -

भाजी               प्रति किलो
वांगी               35 ते 40 रुपये
गवार              50 ते 60 रुपये
वाटाणा           80 ते 90 रुपये
टोमॅटो            40 ते 50 रुपये
शेवगा शेंग      50 ते 60 रुपये
काकडी          30 ते 35 रुपये
फ्लॉवर           25 ते 30 रुपये
गाजर             35 ते 40 रुपये
कारली           35 ते 40 रुपये
कोबी             25 ते 30 रुपये

भाजी            प्रति जुडी
कोथिंबीर      15 ते 20 रुपये
मेथी             20 ते 25 रुपये
पालक         20 ते 25 रुपये



मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये दुधाचा तुडवडा
गोकुळ आणि वारणा, या दोन मोठ्या कंपन्यांचे दूधाचं उत्पादन आणि संकलन प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर व सातारा या पट्ट्यातून होतं. मुंबईतून या कंपन्यांच्या दुधाची सर्वाधिक मागणी असते. एकट्या गोकुळकडून रोज साडे सात लाख लिटरचा पुरवठा मुंबईला होतो. तर वारणासह अन्य काही छोट्या कंपन्या जवळपास साडे सहा लाख लिटर दुधाचा मुंबईला पुरवठा करतात. मात्र या तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास प्रत्येक गाव पुराच्या वेढ्यात आहे. त्यामुळे दुधाचं संकलन पूर्णपणे थांबलं आहे. कोल्हापूर-मुंबई महामार्गदेखील पाण्याखाली असल्याने संकलित झालेल्या दुधाचा या कंपन्या पुरवठा करु शकलेल्या नाहीत. अमूल, मदर्स डेअरी आणि महानंदा या तीन कंपन्यांचा जवळपास 20 लाख 70 हजार लिटर दुधाचा पुरवठा सुरळीत आहे. याशिवाय मुंबईतीलच अन्य छोट्या कंपन्या जवळपास 35 लाख लिटर दुधाचा पुरवठा करतात. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस ठाणे, मुंबई, पनवेल या परिसरात दुधाची टंचाई निर्माण होईल, अशी माहिती दूध कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे.